कोमलवाडी येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना वर्धापन दिन उत्साहात साजरा

माय मराठी न्यूज नेटवर्क


एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सिन्नर एक व दोन अंतर्गत ICDS वर्धापन दिन तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती बुधवार दि. २ ऑक्टोबर रोजी अंगणवाडी केंद्र कोमलवाडी-१ येथे उत्साहात साजरा करण्यात आला. बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश सहाने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. जि.प. सदस्या सिमंतिनीताई कोकाटे तर अध्यक्षस्थानी कोमलवाडीच्या सरपंच सविताताई बोराडे तसेच उपसरपंच अमृताताई अडांगळे व शांताबाई बोराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वडांगळी विभागाच्या पर्यवेक्षिका सविता होलगडे यांनी तर प्रास्ताविक वावी विभागाच्या पर्यवेक्षिका कल्पना गौतम यांनी केले.
यावेळी मार्गदर्शनपर बोलताना गणेश सहाने साहेब यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजना १९७५ पासून आजपर्यंत कशा पद्धतीने वृद्धिंगत होत गेली. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या सेवा दर्जेदार व्हाव्यात व लोकसहभाग कसा वाढवावा याबाबात अंगणवाडी सेविकांना माहिती दिली. तसेच सिन्नर दोन प्रकल्पात चालू असलेल्या पालवी उपक्रमाबाबत माहिती दिली. सिमंतिनीताई कोकाटे व सविताताई बोराडे यांनी सिन्नर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून आयसीडीएसच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच तालुक्यातील सॅम व मॅम बालकांना पौष्टिक आहार किट देण्याचे नियोजन केले. या प्रसंगी कोमलवाडी ग्रामपंचायतीकडून आयसीडीएस वर्धापन दिनाचे औचित्य साधून तीन अंगणवाडी केंद्रांना पालवी प्रकल्पाचे साहित्य देण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा सामूहिकरीत्या घेण्यात आली. तसेच ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. अंगणवाडी सेविकांनी गरोदर मातेचे कौतुक सोहळा अभिनय व गीत सादर केले. ६ महिने पूर्ण झालेल्या बालकाचा अर्धवार्षिक वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच तीन वर्षे पूर्ण झालेल्या बालकाचा अंगणवाडीत प्रवेश कार्यक्रम साजरा करण्यात आला. बालकांना विविध पोशाख घालून वेशभूषा करण्यात आली होती.
आयसीडीएस दिनाचा केक कापून आयसीडीएस दिन चिरायू होऊ, बेटी बचाव बेटी पढाव, सही पोषण देश रोशन अशा घोषणा देत अंगणवाडी सेविकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. कार्यक्रमादरम्यान पर्यवेक्षिका कल्पना गरुड, अर्चना गीते, माधुरी फसाळे, उषा सरोदे, निरंजना सरोदे यांनी अंगणवाडी पोषणाची गाणी सादर केली. यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस, लाभार्थी, पालक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सांगता पर्यवेक्षिका शिल्पा जाधव यांनी केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका बेबीताई बोचरे व इतर सेविका तसेच मदतनीस यांचे मोलाचे सहकार्य लाभले.




