उजनीच्या चार प्रकल्पांविरोधात शेतकरी-मच्छीमार एकवटले
नघोर्ली येथे संजयमामा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; जनसुनावणी घेऊन जनतेला विश्वासात घेण्याची मागणी

करमाळा l प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)

उजनी धरण परिसरात प्रस्तावित तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, एआय डेटा सेंटर आणि लघु मॉड्युलर अणुभट्टी या चार प्रकल्पांविरोधात शेतकरी व मच्छीमारांनी एकजूट केली आहे. या प्रकल्पांसाठी १ लाख ६५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. प्रकल्पांसाठी लागणारे पाणी, वीज आणि पर्यावरणावरील संभाव्य परिणाम स्पष्ट करून जनतेला विश्वासात घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. यासाठी शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी रांजणी येथील महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय नघोर्ली येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
रविवारी दि. २५ ऑक्टोंबर रोजी नघोर्ली येथे माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या फार्महाऊसवर त्यांच्या अध्यक्षतेखाली करमाळा, माढा आणि इंदापूर तालुक्यांतील शेतकरी, मच्छीमार व विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
उजनी धरण परिसरातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आणि मासेमारी आहे. सध्या शेतीला पुरेसे पाणी व वीज मिळत नसताना नव्या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी आणि वीज लागणार आहे. त्यामुळे शेती, मत्स्यव्यवसाय आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती उपस्थितांनी व्यक्त केली. उजनी धरणाची क्षमता ११७ टीएमसी असून, पाण्याचे वाटप झालेले असताना प्रस्तावित प्रकल्पांसाठी १२ टीएमसी पाणी कुठून उपलब्ध होणार, असा प्रश्न संजयमामा शिंदे यांनी उपस्थित केला.
प्रकल्प फायदेशीर असतील, तर शासनाने त्यांची संपूर्ण माहिती जनतेसमोर मांडावी. शेतकरी व मच्छीमारांना विश्वासात घेऊन जनसुनावणी घ्यावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. प्रस्तावित अणुभट्टीचे संभाव्य परिणाम, पर्यावरण आणि जलस्रोतांवरील परिणाम याबाबतही स्पष्ट माहिती देण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
शासनाने संपादित केलेल्या ज्या जमिनी दहा वर्षांपासून वापरात नाहीत आणि त्यावर कोणतेही काम झालेले नाही, त्या संबंधित शेतकऱ्यांना परत द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली. या प्रकल्पांबाबत गावोगावी बैठका आणि रॅली काढून जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले. ३१ ऑक्टोबरच्या आंदोलनात करमाळा, माढा आणि इंदापूर तालुक्यांतील शेतकरी व मच्छीमारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उपस्थितांनी केले.
या बैठकीला बारामती ॲग्रोचे व्हाईस चेअरमन सुभाष गुळवे, करमाळा पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजित विघ्ने, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भरत अवताडे, राजेंद्र धांडे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, चंद्रकांत सरडे, रोहिदास सातव, तानाजी झोळ, गौरव झांजुर्णे, सुजित बागल, सुभाष अभंग, अशपाक जमादार, मानसिंग खंडागळे, उदयसिंह देशमुख, उदयसिंह खाटमोडे पाटील, सचिन गावडे, सोमनाथ रोकडे, ॲड. जालिंदर बसळे, नानासाहेब लोकरे, उमेश इंगळे, नितीन खटके आणि रवींद्र वळेकर उपस्थित होते.
यावेळी ॲड. अजित विघ्ने, ताटे सर, संदीप माने, सौरभ आरकिले, अविनाश सरडे, निलेश देवकर, अक्षय यादव, नंदकुमार नगरे, सीताराम नगरे, सुभाष गुळवे आणि संजयमामा शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली. या बैठकीचे सूत्रसंचालन डॉ. विकास वीर यांनी केले.




