उजनीचे पाणी शेती, पिण्यासाठी अन् मच्छीमारांच्या उपजीविकेसाठीच राखा!
एआय डेटा सेंटरसह चार मोठ्या प्रकल्पांविरोधात शेतकरी, धरणग्रस्त व मच्छीमारांचा साडेचार तास रास्ता रोको; तीन महिन्यांत जनसुनावणी घेण्याचे प्रशासनाचे लेखी आश्वासन

प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)

उजनी धरणातील पाणी शेती, पिण्यासाठी आणि मच्छीमारांच्या उपजीविकेसाठीच राखले पाहिजे. या पाण्यावर आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर परिणाम करणारे प्रस्तावित एआय डेटा सेंटर, तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प आणि स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर (लघु अणुऊर्जा प्रकल्प) अन्य ठिकाणी हलवावेत, या मागणीसाठी शनिवारी (ता. ३१) शेतकरी, धरणग्रस्त व मच्छीमारांनी जोरदार रास्ता रोको आंदोलन केले. सकाळी दहा वाजता सुरू झालेले आंदोलन तब्बल साडेचार तास चालले. अखेर येत्या तीन महिन्यांत शेतकरी व स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन जनसुनावणी घेण्याचे आणि तोपर्यंत सुरू असलेली कामे बंद ठेवण्याचे प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर दुपारी अडीच वाजता आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या प्रस्तावित प्रकल्पांविरोधात करमाळा, माढा आणि इंदापूर तालुक्यांतील युवा शेतकऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून गावोगावी बैठका घेतल्या होत्या. शेतकरी आणि मच्छीमार बांधवांशी चर्चा करून या लढ्याची दिशा ठरविण्यात आली. त्यामुळे आंदोलनासाठी तीनही तालुक्यांतून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. उजनीचे पाणी हे साडेपाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या शेतीचा, लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि मच्छीमार कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा आधार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
यावेळी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी उजनी धरणातील गाळ आणि पाणीसाठ्याचा प्रश्न उपस्थित केला. उजनी धरणात सध्या १९.२५ टीएमसी ग्रॉस कपॅसिटी एवढा गाळ साचल्याचा दावा त्यांनी केला. धरणातील गाळाच्या रचनेत ४८.३ टक्के वाळू, ४०.७५ टक्के गाळ आणि ८.४ टक्के चिकट माती असल्याचे त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत नव्या प्रकल्पांसाठी पाण्याची मागणी करणे योग्य नाही, असे ते म्हणाले.
उजनीचे एक लिटर पाणी आरओ फिल्टरमधून शुद्ध केल्यानंतर केवळ १३१ मिली पाणी स्वच्छ मिळाल्याचा प्रयोगही त्यांनी सांगितला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी शुद्ध करून डेटा सेंटरसाठी वापरले, तर धरणात पाणी राहणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या प्रकल्पात २,८०० कर्मचाऱ्यांना रोजगार मिळणार असल्याचा दावा केला जात असताना त्यांची शैक्षणिक पात्रतेनुसार आकडेवारी जाहीर करावी. तसेच प्रत्यक्षात उजनी परिसरातील मच्छीमारांचा प्रश्न आधी सोडवा, तसेच धरणासाठी संपादित केलेल्या पण वापरात नसलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करा, असे ते म्हणाले.
उजनीवर लाखो किलोमीटरचा प्रवास करून फ्लेमिंगो पक्षी येतात. त्यामुळे या परिसरातील नैसर्गिक संपत्ती आणि पक्ष्यांच्या अधिवासाचेही संरक्षण झाले पाहिजे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्या आल्यास त्यांचे स्वागत करू; मात्र पृथ्वीच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश करणारी गुंतवणूक नको, अशी भूमिका त्यांनी मांडली. उजनी धरणाच्या निर्मितीमागे आपल्या आजोबांचे योगदान असल्याचा उल्लेख करून, आपण असेपर्यंत धरणाचे वाटोळे होऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. उजनीतील वाळू काढण्याची परवानगी केवळ भाजप कार्यकर्त्यांनाच मिळते, असा आरोप करत या प्रकल्पांबाबत सरकारकडे तीन वेळा २२ प्रश्नांची उत्तरे मागूनही माहिती मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
माजी मंत्री महादेव जानकर यांनी एआय डेटा सेंटरऐवजी उजनी परिसरात पर्यटन केंद्र उभारण्याची सूचना केली. पर्यटन केंद्र उभारल्यास स्थानिकांना रोजगार मिळेल आणि त्यातून परिसराचा विकास होईल, असे सांगत अशा प्रकल्पाचे आपण स्वागत करू, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच आमदार नारायण पाटील आणि आमदार अभिजित पाटील यांनी आपले घर सांभाळावे म्हणजेच आपण ज्या पक्षातून निवडून आलो आहोत त्यातच रहावे, असे सांगितले.
आमदार रोहित पवार यांनी या प्रकल्पांमुळे स्थानिकांना रोजगार मिळण्याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या मते, या प्रकल्पातून ४०० पेक्षा अधिक स्थानिकांना रोजगार मिळण्याची शक्यता नाही; मात्र यासाठी सहा ते सात टीएमसी पाणी लागणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी लागणार नसेल, तर हा प्रकल्प उजनी धरणावरच का उभारला जात आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला सुमारे १,१५० मेगावॉट विजेची गरज असताना या प्रकल्पासाठीच १,२५० मेगावॉट वीज लागणार असल्याचा दावा त्यांनी केला. मग शेतकऱ्यांना वीज कुठून देणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
गुजरातमध्ये मोठे उद्योग आणि रोजगारनिर्मिती करणारे प्रकल्प जातात, मात्र महाराष्ट्रातील उजनी परिसरात पाणी व वीज मोठ्या प्रमाणावर वापरणारे प्रकल्प आणले जात आहेत, अशी टीका रोहित पवार यांनी केली. सेमीकंडक्टरसारखा एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला प्रकल्प आला असता तर एक लाख लोकांना रोजगार मिळाला असता. या प्रकल्पातून कंपनीच्या मालकाला वर्षाला अडीच लाख कोटी रुपयांचा नफा मिळणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
सरकारसोबत कोणीही वाटाघाटी केल्या तरी हा प्रकल्प उजनी परिसरात होऊ द्यायचा नाही. उद्या जाऊन सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी करणाऱ्या किंवा वाटाघाटी करणाऱ्या नेत्यांवरही आपले लक्ष असेल, असे सांगत त्यांनी आमदारांची नावे न घेता अप्रत्यक्ष टोला लगावला. उद्या पंतप्रधान जरी या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आले तरी ते उद्घाटन होऊ नये, यासाठी सर्वांनी एकजूट ठेवली पाहिजे. सत्तेला लाथ मारण्याची धमक आणि ताकद आपण ठेवली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
स्थानिक शेतकरी व कार्यकर्त्यांना सोलापूरमध्ये येऊन धमकावण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. पालकमंत्र्यांवर टीका करताना त्यांनी पालकमंत्री हे ‘बालकमंत्री’ असल्याची टिप्पणी केली. उजनीवर साडेपाच लाख शेतकरी अवलंबून असून शेतमजूर, छोटे व्यावसायिक आणि मच्छीमारांचाही उदरनिर्वाह या धरणावर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्या हक्काच्या पाण्याला धक्का लावू देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनाला खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार रोहित पवार, आमदार अभिजित पाटील, आमदार नारायण पाटील, आमदार प्रतापसिंह पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी मंत्री महादेव जानकर यांच्यासह करमाळा, माढा व इंदापूर तालुक्यांतील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्वपक्षीय पदाधिकारी, शेतकरी, धरणग्रस्त आणि मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अखेर प्रशासनाने आंदोलकांच्या मागण्यांची दखल घेत येत्या तीन महिन्यांत सर्व शेतकरी व स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन प्रस्तावित प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली जाईल, त्यानंतर जनसुनावणी घेऊन निर्णय घेतला जाईल, असे लेखी आश्वासन दिले. तोपर्यंत सध्या सुरू असलेली कामे बंद ठेवण्यात येतील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले. या आश्वासनानंतर दुपारी अडीच वाजता रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.
रोहित पवारांचा पालकमंत्र्यांसह दोन्ही आमदारांना अप्रत्यक्ष टोला!
आंदोलनातील भाषणात आमदार रोहित पवार यांनी पालकमंत्र्यांवर जोरदार टीका केली. आजपर्यंतच्या पालकमंत्र्यांमध्ये सर्वाधिक वेळ सरोवर हॉटेलमध्ये राहणारे पालकमंत्री असून ते सकाळी, दुपारी आणि रात्रीही तिथेच काम करतात, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. पालकमंत्री हे ‘बालकमंत्री’ असल्याची टीकाही त्यांनी केली.
तसेच करमाळ्याचे आमदार नारायण पाटील आणि माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांची नावे न घेता त्यांना अप्रत्यक्ष इशारा दिला. उद्या सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी करणाऱ्या आणि प्रकल्पाबाबत वाटाघाटी करणाऱ्या नेत्यांवर माझे लक्ष असेल, असे ते म्हणाले. सरकारसोबत कोणीही कितीही वाटाघाटी केल्या तरी हा प्रकल्प उजनीत होऊ देणार नाही. अगदी पंतप्रधान उद्घाटनासाठी आले तरी उद्घाटन होऊ नये, यासाठी सर्वांनी एकजूट ठेवली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.




