मांगी तलावावर शेतीपंपांची वीज कपात; आता केवळ दोन तास वीज!
आठ तास वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी; अन्यथा उपोषणाचा इशारा

प्रतिनिधी | करमाळा (माय मराठी न्यूज)

करमाळा तालुक्यातील मांगी तलावातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याच्या पार्श्वभूमीवर तलावावरील शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून, सध्या शेतीसाठी केवळ दोन तास वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे मांगी तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असून शेतीपंपांना पूर्वीप्रमाणे आठ तास वीजपुरवठा सुरू ठेवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते.
लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर यांनी तयार केलेल्या कार्यक्रमात करमाळा तालुक्यातील मांगी मध्यम प्रकल्पावरील शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या कार्यवाहीचा समावेश आहे. या यादीत मांगी, उत्तर वडगाव, पुनवर, जातेगाव, हिवरवाडी, दक्षिण वडगाव, रावगाव, भोसे आणि धगटवाडी या गावांचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाणीटंचाई शाखेने महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना पत्र पाठविले आहे. मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवणे आवश्यक असल्याचे नमूद करत, जोडलेल्या कार्यक्रमानुसार कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी दोन तास वीजपुरवठा सुरू ठेवावा, असेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
मात्र, सध्या पावसामुळे मांगी तलाव लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची ऊस, कांदा आणि इतर पिके शेतात उभी आहेत. पिकांना पाण्याची गरज असताना वीजपुरवठा केवळ दोन तासांपुरता मर्यादित केल्याने शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली असून याबाबत मांगी तलाव परिसरातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात, पूर्वीप्रमाणे आठ तास वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. तसेच मागणी मान्य न झाल्यास दि. २८ सप्टेंबर पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला असून यामध्ये संदीप विश्वनाथ काळे, विकास बापूराव गायकवाड व इतर शेतकरी असे नमूद आहे.
♦ मांगी तलावावरील गावे
मांगी, उत्तर वडगाव, दक्षिण वडगांव, पुनवर, जातेगाव, हिवरवाडी, रावगाव, भोसे, धगटवाडी, राखवाडी, लिंबेवाडी या गावांसह परिसरातील इतर गावांची शेती मांगी तलावावर अवलंबून आहे.
पाणी राखायचे, पण पिकेही वाचवायची कशी?
मांगी तलावातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याच्या निर्णयामुळे शेतीपंपांचा वीजपुरवठा कमी करण्यात आला आहे. सध्या केवळ दोन तास वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. एकीकडे तलावातील पाणी जपण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे, तर दुसरीकडे उभी पिके वाचविण्यासाठी पुरेशा वीजपुरवठ्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे आठ तास वीजपुरवठ्याच्या मागणीवर प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे मांगी तलाव लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.




