वाघाचीवाडी येथे शेतात काम करताना वीज कोसळून महिलेचा मृत्यू, एक जखमी

प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)


करमाळा तालुक्यातील वाघाचीवाडी येथे आज शनिवार दि.१३ सप्टेंबर रोजी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत शांताबाई बाळू वाघ यांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. त्याच वेळी शेजारीच काम करत असलेल्या ज्योती आण्णा वाघ या जखमी झाल्या असून त्यांच्यावर करमाळा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी चार वाजताच्या सुमारास शांताबाई वाघ व ज्योती वाघ या शेतातील कांदा पिकाची खुरपणी करत असताना अचानक मेघगर्जनेसह वीज कोसळली. यात शांताबाई यांचा जागीच मृत्यू झाला, तर जखमी झालेल्या ज्योती वाघ यांना तात्काळ उपचारासाठी करमाळा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
मृत शांताबाई यांच्या पश्चात पती, एक विवाहित मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. या अनपेक्षित घटनेने वाघ कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.



