-->
करमाळाविशेषसामाजिक

टाकाऊ साहित्यातून ‘अँटी थेफ्ट अलार्म’ची निर्मिती; तेजस्विनीला विज्ञान प्रेरणा पारितोषिक

 

प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)

 

नवभारत इंग्लिश स्कूल येथे आयोजित विज्ञान प्रदर्शनात सादर केलेल्या प्रयोगाबद्दल स्कूलची विद्यार्थिनी कु. तेजस्विनी विशाल परदेशी हिला मान्यवरांच्या हस्ते ‘पद्मश्री डॉ. अरविंद गुप्ता विज्ञान प्रेरणा पारितोषिक’ प्रदान करण्यात आला. करमाळा येथील यशकल्याणी सेवा भवनच्या सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला.

 

रविवार दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता करमाळा शहरातील पुणे रोड येथील यशकल्याणी सेवाभवन येथे यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था (पुणे) यांच्या वतीने ‘पद्मश्री डॉ. अरविंद गुप्ता विज्ञान प्रेरणा पारितोषिक’ आणि ‘केतकी हिम्मतराव शिंदे समाजदीप पुरस्कार २०२६’ वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी श्री स्वामी समर्थ देवस्थान, अक्कलकोटचे विश्वस्त संपतराव (भारतभाऊ) शिंदे पाटील यांच्या हस्ते आणि सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ व मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक-अध्यक्ष मा. डॉ. अरविंद देशमुख, यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे पाटील, ग्लॅमोवेल वेलनेस प्रा.लि. पुणे च्या संस्थापक संचालिका डॉ. प्रचिती पुंडे, उद्योजक हिम्मतराव शिंदे आणि वीरमाता सौ. अनुजाताई अरविंद निलंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यात कु. तेजस्विनीने नवभारत इंग्लिश स्कूल मध्ये सादर केलेल्या ॲंटी थेफ्ट अलार्म या प्रयोगाबद्दल ‘पद्मश्री डॉ. अरविंद गुप्ता विज्ञान प्रेरणा पारितोषिक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

कु. तेजस्विनी हिने नवभारत इंग्लिश स्कूल येथे आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनात घरातील टाकाऊ वस्तु आणि वडील विशाल परदेशी यांच्या फर्निचर व्यवसायातील शिल्लक पडलेल्या साहित्यातून कॉलनी किंवा वसाहतीत होणाऱ्या चोऱ्या किंवा आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडू शकणाऱ्या ‘अँटीथेप्ट अलार्म सिस्टीम’ हा प्रयोग सादर केला होता. विद्यार्थ्यांच्या विज्ञाननिष्ठ जिज्ञासेला प्रेरणा देण्याच्या हेतूने यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे संस्थापक प्रा. गणेश करे पाटील यांनी या विज्ञान प्रदर्शनाला भेट देत कु. तेजस्विनी हिच्या कल्पकतेला दाद देत तिची या पुरस्कारासाठी निवड केली होती.

 

यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था (पुणे) यांच्या वतीने ‘पद्मश्री डॉ. अरविंद गुप्ता विज्ञान प्रेरणा पारितोषिक’ मिळाल्याबद्दल कु. तेजस्विनी परदेशी हीचे नवभारत इंग्लिश स्कूलच्या संचालिका सौ. सुनिता देवी, मुख्याध्यापिका सौ. अश्विनी क्षीरसागर, पी.एम. श्री. साधना बाई नामदेवराव जगताप न. पा. मुलींची शाळा नं. १ चे मुख्याध्यापक दयानंद चौधरी आणि सर्व शिक्षक वृंदा कडून अभिनंदन करण्यात आले. यासोबतच कु. तेजस्विनी हीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close