
प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)

सहकार युवक मित्र मंडळ (ट्रस्ट), तेली गल्ली, करमाळा यांच्या वतीने गणेशोत्सव २०२६ निमित्त साकारण्यात आलेल्या ‘कर्दळीवनात श्री स्वामी समर्थांचा दृष्टांत’ या भव्य हलत्या देखाव्याचे उद्घाटन यंदा एका अनोख्या आणि समाजाला प्रेरणा देणाऱ्या पद्धतीने करण्यात आले. मूकबधिर मुलांच्या हस्ते या देखाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
सहकार युवक मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवातील देखाव्याचे उद्घाटन पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने करण्याची परंपरा जपली जाते. यापूर्वी माजी सैनिक तसेच शून्यातून स्वतःचा उद्योग उभा करणारे युवा उद्योजक यांच्या हस्ते देखाव्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. यंदा मात्र समाजातील विशेष मुलांना सन्मानाची आणि सहभागाची संधी देत मूकबधिर मुलांच्या हस्ते उद्घाटन करून मंडळाने सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री गणरायाच्या आरतीने करण्यात आली. त्यानंतर मूकबधिर मुलांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांची आरती करण्यात आली आणि त्याच हस्ते ‘कर्दळीवनात श्री स्वामी समर्थांचा दृष्टांत’ या हलत्या देखाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “देव हा केवळ मंदिरात नसतो, तर निष्पाप बालमनातही असतो. विशेषतः बोलता किंवा ऐकता न येणाऱ्या या मुलांच्या निरागसतेत आणि निर्मळ मनात देवत्वाचा अनुभव येतो. त्यामुळे यंदाच्या देखाव्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करून त्यांच्याप्रती आदर आणि समाजातील प्रत्येक घटकाला समान सन्मान देण्याचा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक संवेदनशीलता, समावेशकता आणि माणुसकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. मूकबधिर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साहाने उद्घाटन सोहळ्याला विशेष भावनिक आणि भक्तिमय वातावरण लाभले.
सहकार युवक मित्र मंडळाच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून ‘प्रत्येक व्यक्तीमध्ये दडलेल्या देवत्वाचा सन्मान करा’ हा सुंदर संदेश गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचला आहे.




