-->
करमाळाक्राईम

उजनी जलाशयाच्या काठी तरुणीचा मृतदेह आढळला; खुनाचा संशय, बिटरगाव परिसरात खळबळ!

गळ्याभोवती ओढणी आवळल्याच्या खुणा; मृत तरुणीची ओळख पटविण्याचे करमाळा पोलिसांसमोर आव्हान

 

करमाळा l प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)

 

करमाळा तालुक्यातील बिटरगाव (वां) येथे उजनी जलाशयाच्या काठी अंदाजे २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तरुणीच्या गळ्याभोवती ओढणी आवळलेली दिसून येत असल्याने तिचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मृत तरुणीची अद्याप ओळख पटलेली नसून करमाळा पोलिसांकडून तिची ओळख शोधण्याचे काम सुरू आहे.

 

या घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मृत तरुणीचे वय अंदाजे २५ वर्षे आहे. तिच्या अंगावर निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आणि लाल रंगाचा टॉप असल्याचीही माहिती समोर आली आहे.

 

मृत तरुणीचा मृतदेह उजनी जलाशयाच्या काठी आढळल्याने तो पाण्यातून वाहत आल्याची शक्यता परिसरात व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तसेच तरुणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, तिचा खून झाला आहे का आणि हा प्रकार कुठे घडला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

 

दरम्यान, मृतदेहाच्या गळ्याभोवती ओढणी आवळल्याचे दिसून येत असल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून परिसरात चौकशी तसेच मृत तरुणीची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे बिटरगाव (वां) आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


बिटरगाव (वां) येथे तरुणीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. मृत तरुणीची ओळख पटविण्याचे काम सुरू असून मृत्यूचे नेमके कारण तपास आणि शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. नागरिकांना या तरुणीबाबत काही माहिती असल्यास त्यांनी करमाळा पोलिसांशी संपर्क साधावा.

– रणजित माने, पोलीस निरीक्षक, करमाळा पोलीस ठाणे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close