तुटलेल्या वीजेच्या तारेचा स्पर्श होऊन युवकाचा मृत्यू; महावितरणने भरपाई देण्याची ग्रामस्थांची मागणी

प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)


शेतातील ऊसाला पाणी देण्यासाठी मोटर चालू करण्यासाठी जात असताना तुटलेल्या विद्युत तारेचा गळ्याला स्पर्श होऊन करमाळा तालुक्यातील हिवरे येथील हणुमंत तुकाराम शिंदे वय (३५) या युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार दि. ४ ऑक्टोंबर रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली आहे.
अडीच महिन्यांपूर्वीच हणुमंत याचा धाकटा भाऊ नागेश तुकाराम शिंदे वय २८ याचा अज्ञात वाहनाने ठोकरल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. दोनच महिन्यात कमवत्या दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळाला असून हिवरे गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
हिवरे गावात राहणारे हनुमंत तुकाराम शिंदे (वय-३५) हे शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास हिवरे शिवारातील पांडवडा भागात असलेल्या ऊस शेतीला पाणी देण्यासाठी मोटर चालू करण्यासाठी निघाले होते. हणुमंत शिंदे हे उसातून जात असताना महावितरणच्या तुटून पडलेल्या उघड्या तारेचा त्यांच्या गळ्याला स्पर्श झाला आणि ते तारेला चिकटले. यावेळी झालेल्या आवाजाने शेजारील शेतकऱ्यांना काहीतरी घडले असल्याचे जाणवले. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन हनुमंत यांना तारेपासून सोडवून बेशुद्ध अवस्थेत करमाळ्यातील डॉ. रोहन पाटील यांच्याकडे उपचारासाठी नेले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून शिंदे यांना मृत घोषित केले.
या नंतर करमाळा येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून पोलीसात मृत्यूची नोंद करण्यात आली व दुपारी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळेस हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मृत हनुमंत यांच्या पाठीमागे वृद्ध आई-वडीलांसह पत्नी, दोन मुली, एक मुलगा, भावजय, एक पुतण्या असा परिवार आहे.
महावितरण च्या भोंगळ कारभारामुळे हि दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. या कुटुंबास महावितरण ने आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.
दोन महिन्यातच भरले घर झाले रिते.
शिंदे कुटुंबातील हणुमंत व नागेश हे दोघेही विवाहित होते. अंत्यत कष्टाळू असल्याने मोठ्या कष्टाने त्यांनी उसवाहतुक, तसेच शेतात केळी, उस या माध्यमातून चांगले उत्पन्न घेऊन टोलेजंग बंगला, ट्रॅक्टर खरेदी केले होते. मात्र, नियतीच्या मनात वेगळेच शिजत होते. एक वर्षाच्या मुलाला व पत्नीला सोडून नागेश याचे अपघाती निधन झाले तर दोन महिन्यापुर्वी हणुमंत यास मुलगा झाला. परंतु आज हनुमंतचे देखील निधन झाल्याने सुखाने, आनंदाने भरलेले घर रिते झाले आहे.




1 Concept of synthetic lethality cheapest priligy uk NOA has been estimated to affect 1 in 100 men 2