
प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)

करमाळा तालुक्यातील कोर्टी येथील केतन सोमनाथ मेहेर (वय ३०) हा तरुण २० ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजल्यापासून बेपत्ता झाला आहे. या तरुणाचा लवकरात लवकर शोध घेऊन प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी कोर्टी ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, २२ ऑक्टोबरपर्यंत केतनचा शोध न लागल्यास २३ ऑक्टोबरपासून कोर्टी गाव बंद ठेवून कोर्टी–राशीन रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सकल हिंदू समाज, करमाळा तालुका यांच्या वतीने देण्यात आला आहे.
याबाबत हकीकत अशी की, केतनचे वडील सोमनाथ भिकाजी मेहेर आणि त्यांचा मुलगा किरण हे कोर्टी येथे वडापाव व चहाचा व्यवसाय करतात. गेल्या १७ वर्षांपासून ते एका जागेत भाडेतत्त्वावर हा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. या जागेच्या मालकीवरून मूळ मालक यदुलाल हरिदास शिंदे आणि जुबेर निजाम शेख यांच्यात न्यायालयात वाद सुरू आहेत.
जुबेर शेख यांच्याकडून जागा खाली करण्यासाठी मेहेर कुटुंबाला दमदाटी आणि मारहाण केल्याचे प्रकार यापूर्वी घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे असून त्यामुळे केतन बेपत्ता होण्याच्या घटनेचा या वादाशी काही संबंध आहे का, याचीही पोलिसांनी योग्य दिशेने चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
केतन बेपत्ता झाल्याने गावात चिंतेचे वातावरण असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करून तरुणाचा शोध घ्यावा, असे ग्रामस्थांनी म्हटले आहे. तपासात दिरंगाई झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
२३ ऑक्टोबरला आंदोलनाचा इशारा…
सकल हिंदू समाज, करमाळा तालुका यांच्या वतीने गुरुवार दि. २२ ऑक्टोबरपर्यंत केतनचा शोध न लागल्यास २३ ऑक्टोबरपासून कोर्टी गाव बंद ठेवून कोर्टी–राशीन रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.




