-->
करमाळाविशेष

सहीचा अधिकार काढून घेतल्यानंतरही मुख्याध्यापकांकडून बोनाफाईड; वांगीतील अवधूत विद्यालयातील प्रकार

 

प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)

 

करमाळा तालुक्यातील वांगी नं. २ येथील श्री अवधूत विद्यालयातील कथित बोगस शिपाई भरती प्रकरणावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. संस्थेतील मुख्याध्यापकांच्या कारभाराबाबत शिक्षण विभागाने प्रशासकीय आदेश काढून सहीचा अधिकार काढून घेतल्यानंतरही संबंधित मुख्याध्यापकांनी आपल्या सहीने विद्यार्थ्याला बोनाफाईड प्रमाणपत्र दिल्याचा आरोप उपोषणकर्ते गणेश भानवसे यांनी केला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप करत संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

या प्रकरणातील कथित अनियमितता आणि गैरप्रकाराच्या चौकशीसाठी गणेश भानवसे यांच्यासह पालक व ग्रामस्थांनी दि. १५ ऑगस्ट रोजी उपोषण सुरू केले होते. शिक्षण विभागाकडून कारवाईचे आदेश देण्यात आल्यानंतर १७ ऑगस्ट रोजी हे उपोषण स्थगित करण्यात आले. दरम्यान, सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक राजेंद्र वनवे यांचा सहीचा अधिकार काढून घेतल्याचा आदेश काढला. तसेच संस्थेला दुसऱ्या मुख्याध्यापकाकडे पदाचा चार्ज देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे भानवसे यांनी सांगितले. मात्र, २१ ऑगस्टपर्यंत संस्थेने नव्या मुख्याध्यापकाची नियुक्ती केल्याची किंवा त्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवल्याची माहिती उपलब्ध नसल्याचा त्यांचा आरोप आहे.

विशेष म्हणजे, सहीचा अधिकार काढून घेतल्यानंतरही संबंधित मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याला स्वतःच्या सहीने बोनाफाईड प्रमाणपत्र दिल्याचा आरोप भानवसे यांनी केला आहे. त्यामुळे अधिकार काढून घेतल्यानंतर संबंधितांनी कोणत्या अधिकाराने प्रमाणपत्रावर सही केली, असा सवाल उपस्थित केला जात असून शिक्षण विभागाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून आदेशाचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

दरम्यान, माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांची सोमवारी भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाबाबत भूमिका मांडणार असल्याचे भानवसे यांनी सांगितले. त्यानंतरही न्याय मिळाला नाही तर ग्रामस्थांच्या वतीने सोलापूर येथील शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

शिक्षण विभागाच्या आदेशाची अंमलबजावणी करा
दि. १५ ऑगस्ट रोजी बोगस शिपाई भरती प्रकरणी आम्ही उपोषण सुरू केले होते. शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांचा सहीचा अधिकार काढून घेऊन दुसऱ्या मुख्याध्यापकाला चार्ज देण्याचे आदेश दिल्यानंतर १७ ऑगस्टला उपोषण स्थगित केले. मात्र, आज २१ ऑगस्ट झाली तरी संस्थेने दुसऱ्या मुख्याध्यापकाची नियुक्ती केलेली नाही. सहीचा अधिकार काढून घेतल्यानंतरही बोनाफाईड प्रमाणपत्रावर संबंधित मुख्याध्यापकाची सही असल्याचा प्रकार गंभीर आहे. शिक्षण विभागाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास गुन्हा दाखल करावा. न्याय मिळाला नाही तर पुन्हा उपोषण करणार आहोत.
– गणेश भानवसे, उपोषणकर्ते

बोगस शिपाई भरतीप्रकरणी संस्थेवर कारवाईची शिफारस 
वांगी येथील अवधूत विद्यालयातील शिपाई पदावरील नियुक्तीप्रकरणी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद सोलापूर यांनी दि. १४ मे २०२६ रोजी शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग, पुणे यांच्याकडे अहवाल पाठविला आहे. श्री. अंकुशा सखाराम चव्हाण यांच्या नियुक्तीबाबतच्या तक्रारीवर चौकशी करून हा अहवाल सादर करण्यात आला. नियुक्ती शासनाच्या नियमांच्या विरोधात झाल्याचे अहवालात नमूद असून, संबंधित प्रकरणात संस्थेची मान्यता रद्द करण्यासह योग्य ती दंडात्मक कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

वांगी नं. २ येथील अवधूत विद्यालयातील मुख्याध्यापक पदावरून मला काढलेबाबतचे अधिकृत पत्र संस्थेकडून किंवा शिक्षणाधिकारी यांच्याकडून अद्याप मिळालेले नाही त्यामुळे मी अजूनही या विद्यालयाचा अधिकृत मुख्याध्यापक आहे. मूळ तक्रार बाजूला ठेवून मला नाहक बदनाम करण्याचा प्रकार गावकरी मिळून करीत आहेत. हा प्रकार नाही थांबला तर मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे.

– राजेंद्र वनवे, मुख्याध्यापक, अवधूत विद्यालय वांगी नं. २.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close