उजनीचे पाणी उद्योगांना देणार असाल, तर शेतकरी-मच्छीमार रस्त्यावर उतरतील!
एआय डेटा सेंटरसह सोलर, ग्रीन हायड्रोजन व बॅटरी प्रकल्पांना विरोध; रोहित पवार आंदोलनात उतरणार

प्रतिनिधी I करमाळा (माय मराठी न्यूज)

उजनी धरणातील पाणी हे सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्यांतील शेतकरी, मच्छीमार आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्काचे आहे. हे पाणी एआय डेटा सेंटरसह विविध औद्योगिक प्रकल्पांसाठी वळविण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून धरणग्रस्त शेतकरी आणि मच्छीमार आक्रमक झाले आहेत. या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी धरणग्रस्त शेतकऱ्यांनी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित दादा पवार यांची जामखेड येथे प्रत्यक्ष भेट घेतली. शेतकरी, मच्छीमार, कामगार, मजूर आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहून गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे आश्वासन रोहित पवार यांनी दिले.
उजनी धरणाच्या पाण्यावर परिसरातील शेती, पिण्याच्या पाण्याची गरज आणि मच्छीमारांचा रोजगार अवलंबून आहे. अशा परिस्थितीत एआय डेटा सेंटर, सोलर प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, न्यूक्लियर पॉवर प्रकल्प आणि बॅटरी प्रकल्पांसाठी पाण्याचा वापर करण्याच्या मुद्द्यावरून शेतकरी व मच्छीमारांमध्ये नाराजी आहे. या प्रकल्पांमुळे स्थानिकांच्या पाण्याच्या हक्कावर गदा येऊ नये, अशी त्यांची मागणी आहे.
उजनी धरणग्रस्तांच्या प्रश्नावर रोहित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पाण्याबाबत योग्य भूमिका घेण्याची सूचना दिल्या. तसेच उजनी धरण विभागाच्या अभियंता सुचित्रा डुंबरे यांच्याशी जामखेड येथून दूरध्वनीवर संपर्क साधून सुरू असलेल्या एआय डेटा सेंटरचे काम बंद करण्याची मागणी केली. येत्या २३ ऑक्टोबर पासून आपण स्वतः उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊन एआय डेटा सेंटरला विरोध करणार असल्याचे रोहित पवार यांनी शेतकऱ्यांना सांगितले.
या प्रश्नावर पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता इंदापूर येथील वाघ पॅलेस येथे धरणग्रस्त शेतकरी आणि मच्छीमारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत रोहित पवार आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगण्यात आले.
सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्यांतील धरणग्रस्त शेतकरी, मच्छीमार बांधव आणि संबंधित नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन धरणग्रस्त शेतकरी व मच्छीमार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. उजनीच्या पाण्याबाबत स्थानिकांच्या हक्कांना प्राधान्य मिळावे आणि प्रकल्पांबाबत शेतकरी-मच्छीमारांना विश्वासात घ्यावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
शेतकरी-मच्छीमारांसाठी रस्त्यावर उतरू! – आ.रोहित दादा पवार
उजनी धरणातील पाणी हा शेतकरी, मच्छीमार आणि सर्वसामान्य जनतेच्या जगण्याचा प्रश्न आहे. एआय डेटा सेंटर किंवा अन्य औद्योगिक प्रकल्पांसाठी पाण्याचा वापर करताना स्थानिकांच्या हक्कांकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडल्याचे धरणग्रस्तांनी सांगितले. या प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन शेतकरी, मच्छीमार, कामगार आणि मजूर यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले. गरज पडल्यास धरणग्रस्तांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असेही त्यांनी सांगितले.
उजनी धरणाच्या पाण्यावर आमच्या शेतीचे आणि अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे गणित अवलंबून आहे. शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळाले नाही, तर पिकांचे नुकसान होते आणि कुटुंबांवर आर्थिक संकट येते. मच्छीमारांचाही रोजगार उजनीच्या पाण्यावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत औद्योगिक प्रकल्पांसाठी पाण्याचा वापर करण्यापूर्वी शेतकरी आणि मच्छीमारांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. आमच्या हक्काच्या पाण्याला धक्का लागणार असेल, तर आम्ही शांत बसणार नाही. सर्व धरणग्रस्तांनी एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी आवाज उठवावा.
– अविनाश सरडे, शेतकरी, चिकलठाण (ता. करमाळा)




