एक महिन्यात उजनी धरणग्रस्तांसाठी सकारात्मक निर्णय घेऊ; खा. निंबाळकर यांचे आश्वासन

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे वांगी परिसरातील नागरिकांनी रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली असता येत्या एक महिन्यात राज्य अथवा केंद्र सरकार कडून निश्चित निधी उपलब्ध करून उजनीसाठी ज्या धरणग्रस्तांनी त्याग केला आहे त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. शुक्रवार दि.२ सप्टेंबर रोजी करमाळा तालुक्यातील दोन दिवसीय दौऱ्याच्या समारोप प्रसंगी वांगी नं. १ येथील आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या प्रसंगी वांगी पंचक्रोशीतील वांगी नं १,२,३,४, ढोकरी, बिटरगाव, भिवरवाडी व नरसोबावाडी या गावातील धरणग्रस्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
वांगी नं. १ येथील राम मंदिरात आयोजित केलेल्या या बैठकीचे प्रास्ताविक करताना करमाळा बाजार समिती चे सभापती प्रा. शिवाजी बंडगर यांनी वांगी परिसर हा उजनी धरणामुळे पुनर्वसीत झालेला असून नागरी सुविधासाठी हा परिसर ४५ वर्षे झाली तरी अद्याप संघर्ष करीत असल्याचे सांगितले. धरणग्रस्तांना अग्रहक्काने देय असलेल्या नागरी सुविधा पैकी मजबूत पोहोच रस्ते अद्यापही मिळाले नसल्याचे त्यांनी नमूद केले. शेलगाव ते ढोकरी दरम्यान वांगी नं. ३ येथील स्थानिक अडथळा दूर झाला असल्याने ठप्प झालेली दैनंदिन वाहतूक सुरळीत करण्यासाठी सातशे मीटर अंतराकरिता तात्काळ निधीची उपलब्धता करून द्यावी. तसेच वांगी नं. १ ते पांगरे या अत्यंत खराब रस्त्याला पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून तात्काळ प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी मिळावी अशी ही मागणी प्रा. बंडगर यानी केली.
आदिनाथ चे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख यांनी ही या दोन्ही रस्त्याला तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करत महिन्या भरात ही कामे सुरू व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. महेंद्र पाटील, नितीन तकीक यांनी ही या दोन्ही मागण्यासह वांगी नं. २ ते शेलगाव या खराब रस्त्यासाठी मा.खा. निंबाळकर यांच्याकडे निधी ची मागणी केली.
यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर पुढे बोलताना म्हणाले की, संपूर्ण करमाळा तालुक्यातील अनेक रस्ते प्रचंड नादुरुस्त असून एक स्वतंत्र बजेटच या तालक्यातील रस्त्यासाठी मंजूर करावे लागेल. उजनी धरणामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांचा त्याग मोठा असून या भागातील पदाधिकारी यानी मागणी केलेल्या रस्त्यासाठी केंद्र अथवा राज्य सरकार यांच्याकडील संबंधित खात्याकडून निधी उपलब्ध करून एक महिन्यानंतर होणार्या माझ्या पुढील दोर्यात नारळ फोडून कामाची सुरूवात करण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन दिले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शंभूराजे जगताप, बी.पी. रोंगे, सोलापूर जि.प. चे माजी सभापती शिवाजी कांबळे, भाजप उपाध्यक्ष किरण बोकन, करमाळा शहर अध्यक्ष जगदीश अग्रवाल, अमरजित साळुंके, विलास लबडे, भूषण लुंकड, रामा ढाणे, लक्ष्मण केकान, आदिनाथचे माजी संचालक भारत साळुंके, दत्ता देशमुख, संजू देशमुख, विठ्ठल शेळके, संजय कदम, अर्जुन आबा तकीक, तानाजी देशमुख, डाॅ. भाऊसाहेब शेळके, अमर आरकिले, दत्ता आरकिले, सुशांत आरकिले, देवा पाटील, सुनील सांगवे, राऊ काका देशमुख, अनिल बोरकर, बाबासाहेब चौगुले, अवि देशमुख, धनंजय गायकवाड, महादेव चौधरी, विशाल तकीक, रामेश्वर तळेकर तसेच पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.




