-->
करमाळा

वाशिंबे रेल्वे स्टेशनवर दौंड–कलबुर्गी शटलला अखेर थांबा मंजूर; दोन वर्षांच्या पाठपुराव्याला यश

 

प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)

 

वाशिंबे रेल्वे स्टेशनवर दौंड–कलबुर्गी शटलला प्रवासी थांबा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे वाशिंबे तसेच परिसरातील प्रवाशांची अनेक दिवसांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली असून, ये-जा करण्यासाठी प्रवाशांना मोठी सुविधा मिळणार आहे. या थांब्यासाठी वाशिंबे येथील सुयोग झोळ यांनी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. प्रवासी सेवा संघ, लोकप्रतिनिधी, परिसरातील ग्रामपंचायती, शैक्षणिक संस्था आणि पत्रकारांच्या सहकार्याने विविध स्तरांवर ही मागणी लावून धरण्यात आली होती.

 

या मागणीसाठी प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, युवा नेते दिग्विजय बागल, नगरसेवक दीपक चव्हाण, संचालक गणेश झोळ, भाजप अध्यक्ष सचिन पिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अमरजीत साळुंके, जेऊर प्रवासी असोसिएशनचे सुहास सूर्यवंशी तसेच प्रदीप पवार यांचे सहकार्य लाभले. याशिवाय सोगाव, वाशिंबे, मांजरगाव, गोयेगाव, उंदरगाव आणि राजुरी येथील ग्रामपंचायती, अभिनव माध्यमिक विद्यालय, शरदचंद्रजी पवार विद्यालय, राजेश्वर विद्यालय तसेच पत्रकार संघानेही या मागणीला पाठिंबा दिला.

 

दोन वर्षांच्या काळात शेकडो निवेदने देण्यात आली. ई-मेल, दूरध्वनीद्वारे पाठपुरावा करण्याबरोबरच रेल्वे अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या. वृत्तपत्रांमधूनही वाशिंबे रेल्वे थांब्याची मागणी सातत्याने मांडण्यात आली. त्यामुळे या मागणीला मोठे बळ मिळाले. अखेर रेल्वे बोर्डाने दौंड–कलबुर्गी शटलला वाशिंबे स्टेशनवर प्रवासी थांबा मंजूर केला आहे.

या निर्णयामुळे वाशिंबे, सोगाव, मांजरगाव, गोयेगाव, उंदरगाव, राजुरी तसेच परिसरातील नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी मोठी सोय होणार आहे. विशेषतः शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि दैनंदिन कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना या थांब्याचा फायदा होणार आहे.


ही मागणी केवळ कागदावर मांडली नाही, तर दोन वर्षे सातत्याने प्रत्येक स्तरावर पाठपुरावा केला. अनेक अडचणी आल्या, निराशाही वाटली; मात्र प्रयत्न थांबवले नाहीत. प्रवासी संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांचा या निर्णयामध्ये सिंहाचा वाटा आहे. परिसरातील ग्रामपंचायती, शैक्षणिक संस्था आणि पत्रकार बांधवांच्या सहकार्यामुळे हा निर्णय शक्य झाला. सकाळच्या सत्रात पुण्याच्या दिशेने थांबा मिळावा, यासाठीही प्रयत्न सुरू असून त्याबाबतही सकारात्मक निर्णय होईल.

– सुयोग झोळ, वाशिंबे (ता. करमाळा)

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close