-->
करमाळाराजकिय

केमच्या कुंकू उद्योगाला रेल्वे, रस्ते, एमआयडीसीच्या अडचणींचा फटका; प्रश्न सोडविण्याचे आमदार हेमंत पाटील यांचे आश्वासन

 

प्रतिनिधी | करमाळा (माय मराठी न्यूज)

 

केम (ता. करमाळा) येथील पारंपरिक कुंकू उद्योगाची पाहणी करण्यासाठी हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार तथा विधान परिषद आमदार हेमंत पाटील आणि परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी शुक्रवार दि. २१ ऑगस्ट रोजी केम येथे भेट दिली. यावेळी कुंकू कारखानदार व ग्रामस्थांनी गावातील विविध अडचणी आणि प्रलंबित विकासकामे त्यांच्या निदर्शनास आणून दिली.

 

केम गावाला ‘कुंकवाचे गाव’ म्हणून ओळख असून येथे सुमारे २५ कुंकू कारखाने आहेत. या उद्योगातून जवळपास ३०० ते ४०० नागरिकांना रोजगार मिळतो. मात्र, खराब रस्ते, रेल्वे स्थानकावरील बंद असलेली पार्सल सुविधा, प्रलंबित एमआयडीसी प्रकल्प तसेच विविध शासकीय विभागांच्या अटी-शर्तींमुळे कुंकू उद्योगाच्या वाढीला अडथळे येत असल्याचे कारखानदारांनी सांगितले.

 

केमला जोडणारे प्रमुख रस्ते तातडीने सुधारावेत, एमआयडीसीचा प्रलंबित प्रकल्प मार्गी लावावा, इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, केम रेल्वे स्थानकावर अधिक गाड्यांना थांबा द्यावा आणि बंद झालेली रेल्वे पार्सल सेवा पुन्हा सुरू करावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

 

ग्रामस्थ आणि कारखानदारांच्या समस्या जाणून घेत आमदार हेमंत पाटील यांनी केमच्या उद्योग व विकासाशी संबंधित प्रश्न उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून देऊन आवश्यक सुविधांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. केममध्ये उद्योगधंदे वाढून स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

यावेळी उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, ग्रामसेवक वैभव तळेकर यांच्यासह कुंकू कारखानदार, ग्रामस्थ व विविध पदाधिकारी उपस्थित होते. तसेच कुंकू कारखानदार गोडसे आण्णा, संदेश गोडसे, गोरख खानट, धनंजय सोलापूरे, कृषी सहाय्यक प्रवीण दगडे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब बिचितकर, प्रहार संघटना करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, बापू तळेकर, सागर दोंड, ग्रामपंचायत सदस्य गोरख पारखे, सागर कुरडे, उपसरपंच शरद वायबासे, रंधवे गुरुजी, महादेव लोंढे सर, पाटील सर यांच्यासह केम येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


केम ग्रामस्थांनी मांडल्या गावच्या व्यथा 

 केम ग्रामस्थांनी गावातील विविध अडचणींचा पाढाच आमदारांच्या समितीसमोर मांडला. ‘कुंकवाचे गाव’ म्हणून ओळख असलेल्या केममधील कुंकू उद्योगाला रेल्वे सुविधेअभावी मोठा फटका बसत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. रेल्वे स्थानकावरील बंद असलेली पार्सल सेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. पार्सल सेवा बंद असल्याने कुंकू कारखान्यांमधून माल पाठवताना अडचणी येत असून उद्योजक, व्यापारी व कामगारांवर त्याचा परिणाम होत आहे. तसेच गावातील रस्ते, जलसंधारणाची कामे आणि एमआयडीसीशी संबंधित प्रलंबित कामे मार्गी लावावीत, अशी मागणी करण्यात आली. प्रहारचे संदीप तळेकर यांनीही गावातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले.


आमदारांची अंदाज समिती मधील सदस्य आमदार हेमंत पाटील आणि डॉ. राहुल पाटील हे करमाळा तालुक्यातील केम येथील कुंकवाचे कारखाने पाहण्यासाठी आले होते. आमदार हेमंत पाटील हे हळद केंद्राचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी केम येथील कुंकू कारखान्याची पाहणी करून तेथील व्यावसायिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

– शिल्पा ठोकडे मॅडम, तहसीलदार, करमाळा.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close