
प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)

भोंदू मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले प्रकरणाच्या तपासात दत्तकला इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्या पत्नी माया झोळ यांच्यासह तिघांना न्यायालयाने २१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या दरम्यान, प्रा. रामदास झोळ हे फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
या प्रकरणात माया झोळ यांचा सहभाग तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यांना १६ ऑगस्ट रोजी अटक केली. त्यापूर्वी रामदास झोळ यांना मदत करणाऱ्या संस्थेतील राजेंद्र गोकुळ हुंबे याला ११ ऑगस्ट रोजी, तर लक्ष्मीकांत मनमथ लिगाडे याला १३ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. या तिघांना सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी अधिक तपासासाठी कोठडीची मागणी केली असता न्यायालयाने तिघांनाही २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली आहे.
भोंदू मनोहर भोसले प्रकरणी कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात २३ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आतापर्यंत एकूण २४ आरोपी निष्पन्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अवैध पैशांच्या व्यवहाराचा तपास
पोलिसांच्या तपासात दत्तकला इन्स्टिट्यूट, स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणे येथील संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांचा मनोहर भोसले याला प्राप्त झालेल्या अवैध पैशांची विल्हेवाट लावण्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगितले जात आहे. या अनुषंगाने रामदास झोळ यांना मदत करणाऱ्या संस्थेतील व्यक्तींवरही कारवाई करण्यात आली आहे.




