ट्रक आणि कारची समोरासमोर धडक; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जण जागीच ठार

माय मराठी न्यूज नेटवर्क


चुकीच्या दिशेने आलेल्या ट्रकने कारला धडक दिल्याने पुणे अहमदनगर महामार्गावर रांजणगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात रांजणगाव जवळ झाला असून मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. मृत व्यक्ती अहमदनगर जिल्ह्यातील आवाने बुद्रुक येथील रहिवाशी असून हा अपघात झाल्याचे गावात समजताच गावावर शोककळा पसरली आहे. अपघाताच्या माहितीनंतर गावातील काहीजण घटनास्थळाकडे रवाना झाले होते.
चुकीच्या दिशेने येणारा ट्रक अचानक मधल्या रस्त्यावर आला आणि कार ट्रकला धडकली. यामध्ये कारमधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १ जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. या अपघातात संजय भाऊसाहेब म्हस्के (वय ५३), राम भाऊसाहेब म्हस्के (वय ४५), राम राजू म्हस्के (वय ०७), हर्षदा राम म्हस्के (वय ०४), विशाल संजय म्हस्के (वय १६) यांचा मृत्यू झाला. या अपघातात गंभीर जखमीला स्थानिक खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
रांजणगाव एमआयडीसीतील एलजी कंपनीसमोर हा भीषण अपघात झाला. या गाडीतील सर्व प्रवासी पनवेलला जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने वाहने बाहेर काढण्यात आली.




