हिवरवाडी जिल्हा परिषद शाळेची शिष्यवृत्तीत दमदार कामगिरी; चौथीतील सात विद्यार्थी पात्र, गुणवंतांचा सन्मान

प्रतिनिधी I करमाळा (माय मराठी न्यूज)


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिवरवाडी (ता.करमाळा) येथील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील एकूण सात विद्यार्थी पात्र ठरले असून, त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कर्ष धनाजी पवार, समीक्षा दत्तात्रय मेरगळ, श्रुती गोरख पवार, समर्थ महेश इरकर, जानवी राजेंद्र इरकर, प्रज्वल बापू इरकर आणि वैष्णवी निलेश इरकर या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले असून या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि वर्गशिक्षक श्री. नाना वारे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. याचबरोबर विनोबा संस्थेतर्फे आयोजित ‘नन्हे सितारे स्पेलिंग बी’ स्पर्धेत शाळेतील स्वराली राजेंद्र इरकर हिने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या यशात आणखी भर घातली असून तिला वर्गशिक्षिका दिपाली गायकवाड मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे वर्गशिक्षक श्री. नाना वारे सर यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
विशेष म्हणजे, शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणाऱ्या याच विद्यार्थ्यांनी गतवर्षी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतही उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यामुळे “खेळाबरोबर शिक्षण आणि शिक्षणाबरोबर खेळ” हा आदर्श या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला आहे. यावेळी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



