
प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)


मानाच्या पालख्यांपैकी एक असलेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडी पालखी चा परतीचा प्रवास यंदा वारकऱ्यांसाठी मोठा त्रासदायक ठरत आहे. माढा तालुक्यातील उपळवटे ते करमाळा तालुक्यातील केम या मार्गावरील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीच्या रथाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे वारकरी आणि दिंडीतील पदाधिकारी यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पालखी मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे, चिखल आणि साचलेले पाणी असल्याने रथ पुढे नेणे कठीण झाले. अखेर बैलजोडीऐवजी ट्रॅक्टरच्या साहाय्याने रथ ओढावा लागला. खडतर आणि चिखलमय रस्त्यामुळे वारकऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक वारकरी घसरून पडल्याने किरकोळ जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, यासाठी गेल्या तीन-चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र अद्यापही रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्याचा आरोप दिंडी प्रमुख राहुल साळुंखे यांनी केला आहे. स्थानिक प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
याप्रकरणी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वारकरी संप्रदायाकडून करण्यात आली आहे. अन्यथा पुढील वर्षी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा परतीचा मार्ग बदलण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा स्पष्ट इशाराही दिंडी प्रमुखांनी दिला असून वारकरी संप्रदायाने ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, तालुका व जिल्हा प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने मार्ग दुरुस्तीचे काम सुरू करावे, अशी मागणी केली आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आम्ही प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र अद्यापही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. यामुळे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या रथाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून वारकऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्त न केल्यास पुढील वर्षी पालखीचा मार्ग बदलण्याचा निर्णय घ्यावा लागेल.
– ह.भ.प. राहुल महाराज साळुंखे (दिंडी प्रमुख, संत निवृत्तीनाथ महाराज पालखी)



