
प्रतिनिधी | करमाळा (माय मराठी न्यूज)


करमाळा तालुक्यातील केम गावात घडलेल्या खुनाच्या गंभीर घटनेचा करमाळा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उलगडा करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. सुरुवातीला आकस्मित मृत्यू म्हणून नोंद झालेल्या या प्रकरणाचा पोलिसांनी बारकाईने तपास करत हा खून असल्याचे स्पष्ट केले. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा, चौकशी आणि तांत्रिक तपास सुरू केला. तपासाच्या धागेदोऱ्यांवरून आरोपींपर्यंत पोहोचत पोलिसांनी अल्पावधीतच गुन्हा उघडकीस आणला आणि दोन आरोपींना अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी केम गावातील दत्तात्रय तुकाराम देवकर यांच्या शेतातील विहिरीजवळ एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत करमाळा पोलीस ठाण्यात सुरुवातीला आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, पुढील तपासात हा खून असल्याचे स्पष्ट झाले. मृत व्यक्तीची ओळख मल्हारी पोपट कांबळे (वय ३८) अशी पटली. तो नेहमी दारूच्या नशेत भांडण करत असल्याची माहिती तपासात समोर आली. त्याच्या नातेवाईकांकडून व गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार तसेच मयताच्या वैद्यकीय अहवाला मुळे पोलिसांनी खुनाच्या दिशेने तपास करण्यास सुरूवात केली.
तपासादरम्यान मयत मल्हारी कांबळे याची बहीण शीतल राजू केंगार (वय ३२) व राजेश बापू केंगार (वय ३०, दोघे रा. केम) यांच्यावर पोलिसांचा संशय बळावला. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. दारूच्या नशेत झालेल्या वादातून त्यांनी मल्हारी कांबळे याचा गळा आवळून खून केला व मृतदेह शेतातील विहिरीजवळ टाकून पुरावा लपवण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित माने करत आहेत. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा गुन्हे अन्वेषण पथकाने ही कारवाई केली आहे.



