प्रतिनिधी | करमाळा (माय मराठी न्यूज)


भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या सहीने सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी करमाळा तालुक्यातील युवा व अभ्यासू कार्यकर्ते गणेश नागनाथ चिवटे यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीचे पत्र माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते गणेश चिवटे यांना देण्यात आले असून या निवडीमुळे करमाळा तालुक्याला भाजपच्या संघटनात्मक राजकारणात प्रथमच जिल्हाध्यक्षपदाचा मान मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
गणेश चिवटे यांनी बजरंग दलातून आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. विद्यार्थी दशेपासूनच ते भारतीय जनता पक्षात सक्रिय असून पक्षाच्या विचारधारेचा प्रसार, संघटन वाढविणे आणि युवकांना पक्षाशी जोडण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे. करमाळा तालुक्यासह संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढविण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे.
संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव असलेल्या गणेश चिवटे यांनी भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष, भाजप तालुकाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस अशा विविध पदांवर जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. करमाळा नगरपालिकेचे नगरसेवक तसेच बांधकाम समिती सभापती म्हणूनही त्यांनी काम केले असून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ही त्यांनी करमाळा तालुक्यातील अनेक विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
सामाजिक क्षेत्रातही गणेश चिवटे यांचे योगदान उल्लेखनीय आहे. श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम, वृद्धांसाठी व विद्यार्थ्यांसाठी अन्नपूर्णा योजना तसेच सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. दूध व्यवसायातून स्वतः प्रगती करत अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले असून शेतकऱ्यांना दूध उत्पादक बनविण्यासाठीही त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
त्यांच्या पत्नी अश्विनी चिवटे या नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत करमाळा तालुक्यातील वीट गटातून विक्रमी मतांनी विजयी झाल्या असून सध्या त्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती चेतनसिंह उर्फ बाळासाहेब केदार सावंत यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर गणेश चिवटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रा. स्व. संघाचे संस्कार, पक्षनिष्ठा, संघटनात्मक अनुभव आणि कार्यकर्त्यांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क यामुळे त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी विश्वास व्यक्त केला असल्याचे बोलले जात आहे.
गणेश चिवटे यांच्या निवडीमुळे सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्ह्यात भाजपचे संघटन आणखी मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून करमाळा तालुक्यासाठी ही नियुक्ती अभिमानाची बाब मानली जात आहे. कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत करत अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.




