-->
करमाळासामाजिक

दिवेगव्हाण–पारेवाडी मंजूर रस्त्याचे काम तातडीने सुरू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

खड्डे, साचलेले पाणी व वाढलेली झाडीमुळे नागरिक हैराण; ग्रामस्थांचे तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

 

प्रतिनिधी | करमाळा (माय मराठी न्यूज)

 

करमाळा तालुक्यातील मौजे दिवेगव्हाण ते पारेवाडी या मंजूर सार्वजनिक रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अन्यथा समस्त ग्रामस्थांना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिवेगव्हाण व परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन बुधवार दि. २२ जुलै रोजी करमाळा येथील सार्वजनिक बांधकाम विभाग (पी डब्लू डी) तसेच तहसीलदार यांना दिवेगव्हाण ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले आहे.

 

या निवेदनात म्हटले आहे की, दिवेगव्हाण ते पारेवाडी हा सार्वजनिक रस्ता अत्यंत खराब झाला असून संपूर्ण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वार, चारचाकी चालक तसेच पादचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

 

तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे व झुडपे मोठ्या प्रमाणात वाढल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. समोरून येणारी वाहने वेळेवर दिसत नसल्याने नागरिकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रस्त्यालगतची झाडी तात्काळ हटवून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे.

 

सदर निवेदनात स्पष्ट केले आहे की, दिवेगव्हाण–पारेवाडी रस्त्याचे काम मंजूर असूनही अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे प्रशासनाने कोणताही विलंब न करता रस्त्याच्या कामाला तातडीने सुरुवात करावी. अन्यथा या परिसरातील सर्व ग्रामस्थ लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडतील आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.


दिवेगव्हाण–पारेवाडी रस्ता मंजूर होऊनही अद्याप काम सुरू झालेले नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. या रस्त्यामुळे रोज विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन रस्त्याचे काम सुरू करावे. अन्यथा समस्त ग्रामस्थांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

– हनुमंत खाटमोडे, ग्रामस्थ, दिवेगव्हाण.


दिवेगव्हाण ते पारेवाडी रस्त्याचे काम मंजूर झाले असून ते काम पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला यापूर्वी दोन वेळा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांनी सोमवारपासून काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. जर त्यानंतरही काम सुरू झाले नाही, तर टेंडरच्या अटी व नियमांनुसार संबंधित ठेकेदारावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.

– अभिषेक पवार, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, करमाळा.

 

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close