-->
करमाळाराज्यविशेषसामाजिक

मुख्यमंत्री सहायता निधीस प्रा. रामदास झोळ यांची एक लाखांची मदत; वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा अनोखा उपक्रम

 

प्रतिनिधी | करमाळा (माय मराठी न्यूज)

 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजप नेते प्रा. रामदास मधुकर झोळ यांनी समाजसेवेचा आदर्श घालून दिला आहे. प्रा. रामदास झोळ फाउंडेशन, करमाळा तालुक्याच्या वतीने त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस एक लाख रुपयांचा धनादेश मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

मुख्यमंत्री सहायता कक्षामार्फत राज्यात नैसर्गिक आपत्ती, अपघात किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या गरजू नागरिकांना आर्थिक मदत केली जाते. अशा गरजू रुग्णांना व संकटात सापडलेल्या कुटुंबांना मदतीचा हात मिळावा, या सामाजिक भावनेतून प्रा. झोळ यांनी ही आर्थिक मदत दिली असल्याचे सांगितले.

 

यापूर्वीही प्रा. रामदास झोळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. सन २०२५ मध्ये वाशिंबे येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच करमाळा तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला होता. त्याचवेळी मुख्यमंत्री सहायता निधीसही एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला होता.

 

सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष कौतुक केले. तसेच समाजहितासाठी प्रामाणिकपणे सुरू असलेल्या कार्याबद्दल त्यांनी प्रा. रामदास झोळ यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

प्रा. रामदास झोळ यांच्या या उपक्रमामुळे गरजू रुग्ण, आपत्तीग्रस्त व आर्थिक मदतीची गरज असलेल्या अनेक कुटुंबांना दिलासा मिळण्यास मदत होणार असून, त्यांच्या या सामाजिक कार्याचे करमाळा तालुक्यात सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close