
प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)


करमाळा शहरातील सिद्धार्थनगर येथे घरफोडी करून सोन्याची अंगठी व रोख रक्कम चोरी करणाऱ्या आरोपींना करमाळा पोलिसांनी तात्काळ अटक करून गुन्ह्याची उकल केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेला मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील रंगनाथ गोरे (वय ५४, रा. सिद्धार्थनगर, करमाळा) हे १ एप्रिल रोजी घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारी देवदर्शनासाठी बाहेर पडताना त्यांनी सोन्याची अर्धा तोळा वजनाची अंगठी घरातील गादीखाली ठेवली होती. संध्याकाळी घरी परतल्यानंतर त्यांना घराच्या मागील दरवाज्याची कडी तुटलेली व घरातील सामान विस्कटलेले दिसले. तपासणी केली असता सोन्याची अंगठी आणि १५ हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याचे लक्षात आले.
याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला. गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्हीच्या आधारे करण ज्ञानदेव भोसले (वय ३२) व ओंकार उर्फ दाद्या पप्पू रजपूत (वय २०) तसेच विधी संघर्ष बालक (वय १७) यांना पकडण्यात आले आहे.
चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून सुमारे ७५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी व १५ हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. अशपाक शेख हे करत असून ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस पथकाने केली आहे.



