उजनीचे पाणी पेटणार.? उजनी धरणग्रस्तांनी ‘या’ दोन मागण्यांसाठी दिले तहसीलदार यांना निवेदन
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


पुणे जिल्हयातील इंदापूर व बारामती या दोन तालुक्यासाठी महत्त्वाची असणाऱ्या लाकडी लिंबोडी उपसा सिंचन योजनेला तसेच कृष्णा मराठवाडा जेऊर बोगद्यासंबंधीच्या जाचक तरतूदीला विरोध करत करमाळा तालुक्यातील उजनी धरणग्रस्तांनी आज गुरुवार दिनांक १९ मे रोजी करमाळा तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर केले. सदर निवेदन नायब तहसीलदार श्री. बदे साहेब यांनी स्विकारले.
सदर निवेदनात म्हटले आहे की, लाकडी लिंबोडी उपसा सिंचन योजना ही नियोजन बाह्य असल्याने ती तात्काळ रद्द करावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली आहे. तसेच कृष्णा मराठवाडा जेऊर बोगद्यातून मराठवाड्याला पाणी देताना उजनी शंभर टक्के भरले नंतरच द्यावे अशी तरतूद करण्याची मागणी करण्यात आली आहे. उजनी जलाशय ते कोळगाव धरण या दरम्यान जेऊर बोगद्यावर परिसरातील शेतकऱ्यांना पाणी उचलण्यासाठी परवाने द्यावेत अशी ही मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे साहेब यांच्यासह उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, जलसंपदा मंत्री श्री. जयंत पाटील, पालकमंत्री श्री. दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी श्री. मिलिंद शंभरकर साहेब यांना देण्यात आले आहे. तसेच वरील मागण्यांचा सहानुभूती पूर्वक तात्काळ विचार करावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी निवेदनकर्त्यानी दिला आहे. यावेळी निवेदन देण्यासाठी शेकडो नागरिक तहसीलदार कार्यालयात उपस्थित होते.
निवेदन देताना उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर, आदिनाथचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख, बाजार समितीचे संचालक चंद्रकांत सरडे, आदिनाथचे माजी संचालक भारत साळुंके, मकाईचे संचालक संतोष देशमुख, अजित रणदिवे, बहुजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम, युवराज रोकडे, भाऊसाहेब शेळके, विकास पाटील, हिराजी चौगुले, भैरवनाथ बंडगर, नागनाथ मंगवडे, सुयोग झोळ, नितीन आढाव, अर्जुन तकीक, विजय रोकडे, दत्ता बापू देशमुख, बाबासाहेब चौगुले, धनंजय गायकवाड, महेंद्रसिंग ठाकुर, गंगाराम वाघमोडे, देवीदास साळुंके, वैभव पाटील, शिवसेना शहरप्रमुख प्रवीण कटारिया, उपप्रमुख गानबोटे, तानाजी देशमुख, गणेश पाटील, राजकुमार आदिनाथ देशमुख, अर्जुन वारगड, पंडीत रणदिवे, रामहरी झांझुर्णे, अक्षय सरडे आदि शेतकरी उपस्थित होते.
उजनी जलाशयातील ८४.३४ टी.एम.सी. पाण्याचे वाटप १९९७ पूर्वीच झाले असताना इंदापूर, बारामतीला पाणी नेण्यासाठी आकड्यांची मोडतोड करीत व अधिकारी हाताखाली धरून योजना बाह्य व नियमबाह्य पद्धतीने उजनीतील पाणी पळवण्याचा प्रयत्न पालकमंत्री दत्ता मामा भरणे करीत असून तात्काळ ही योजना रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करणार आहोत.
प्रा. शिवाजीराव बंडगर अध्यक्ष, उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती करमाळा तालुका
सरकार चुकीच्या पद्धतीने वागत असून मूळ धरणग्रस्तांच्या तोंडातील घास हिसकावून घेत आहे. आम्ही आमची घरे दारे, जमिनी, गावे जलाशया साठी देवून त्याग केला आहे. आमच्या हक्काचं पाणी कोणी हिसकावून घेत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. सरकारने तात्काळ ही योजना रद्द करावी.
श्री. चंद्रकांत सरडे, संचालक, कृषि उत्पन्न बाजार समिती, करमाळा
कृष्णा मराठवाडा जेऊर बोगद्यातून मराठवाड्याला पाणी देताना उजनी धरण शंभर टक्के भरले नंतरच द्यावे.
श्री.शहाजीराव देशमुख माजी उपाध्यक्ष, आदिनाथ सह. सा. कारखाना




