पोहण्याचा मोह मृत्यूपर्यंत घेऊन गेला; दोन शाळकरी मुलांनी आपला जीव गमावला
माय मराठी न्युज


शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांना शेततळ्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला आहे. या दोन्ही मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना मंगळवारी २० जुलै रोजी दुपारी यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यामधील नांदुरा खुर्द शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात पिकाला खत टाकण्यासाठी गेल्यावर घडली आहे.
या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नांदुरा खुर्द शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात पिकाला खत टाकण्यासाठी काही शाळकरी मुलं गेली होती. या मुलांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे ती शेतामधील कामे करायची. त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांना आधार मिळायचा. या सर्व मुलांनी शेतातील खत टाकण्याचे काम संपवून घरी परतत असताना त्यांना पाण्याने भरलेले शेततळे दिसले. त्यानंतर खत टाकण्यासाठी गेलेल्या मुलांपैकी दोघांना पोहण्याचा मोह आवरला नाही. त्या दोन मुलांनी थेट शेततळ्यात उडी घेतली. शेततळ्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असल्यामुळे ही दोघे त्यात अलगद अडकले. शेततळ्यात उडी मारलेली दोघेजण बराच वेळ पाण्याबाहेर न आल्याने इतर मुलांनी नांदुरा खुर्द ग्रामस्थांना याची माहिती दिली. यानंतर नांदुरा ग्रामस्थांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. शेत तळ्यात बुडालेल्या मुलांना बाहेर काढण्यात आले मात्र तोपर्यंत या दोघांना बाहेर काढण्यास फार उशीर झाला होता. यामुळे या दोघांचाही मृत्यू झाला होता. दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.




