-->
आरोग्यराज्य

जनावरांच्या ‘लंम्पि’ आजारामुळे शेतकरी हैराण; कशी घ्यावी काळजी- वाचा सविस्तर

 

माय मराठी न्यूज नेटवर्क

 

गेल्या काही वर्षांपासून साथीच्या रोगाने अगदी थैमान घातले आहे. कोरोना पासून गेली दोन वर्ष मानवी जीवन विस्कळीत झाले आहे. त्यानंतर ओमिक्रॉन आणि मग मंकीपॉक्स यांसारख्या आजारांनी मानवी जीवन त्रासून सोडले आहे. परंतु, काही दिवसांपासून प्राण्यांना म्हणजेच जनावरांना सुद्धा काही वेगळेच आजार होत असल्याचे दिसून आले आहे, त्यामध्ये लंम्पि हा एक आजार दिसून आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या प्राण्यांची आणखी चांगल्या प्रकारे निगराणी करावी लागणार आहे.

 

लंम्पि हा जनावरांना होणारा एक त्वचेचा आजार आहे. गेले काही दिवसांपासून या आजाराचा धोका वाढला आहे. या आजारामुळे आतापर्यंत २२ जनावरांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील जळगाव, धुळे या जिल्ह्यांमध्ये या आजाराचे जास्त प्रमाण दिसून आले आहे. त्यासाठी जनावरांची योग्य काळजी घ्यावी असे पशुवैद्यांचे मत आहे. हा आजार कशामुळे पसरतो याची थोडक्यात माहिती घेऊ.

 

लंम्पि- कशामुळे होतो?
या रोगाची लागण “कॅप्रीपॉक्स” (Capri pox) नावाच्या विषाणू मुळे होते. हा विषाणू शेळ्या व मेंढ्यांमधील देवी रोगाच्या विषाणूशी संबंधित आहे. त्याचबरोबर गुरांच्या गोठ्यातील माशा, विशिष्ट डास आणि गोचीड यांच्यामुळे सुद्धा हा आजार होतो. हा आजार मुख्यतः गायी, बैल म्हैस या प्रकारातील जनावरांना होतो.

 

लंम्पि-आजाराची लक्षणे

▪️जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येणे

▪️लसिका ग्रंथींना सूज येणे.

▪️जनावरांचे चारा खाण्याचे प्रमाण कमी होते. त्याचबरोबर त्यांना १०२ ते १०४ पर्यंत ताप येतो.

▪️त्याचबरोबर मान, पोट, कास या ठिकाणी जवळपास दहा एमएम व्यासाच्या गाठी येतात.

▪️दुभती जनावरे दूध कमी देतात त्याचबरोबर पाणी आणि चारा कमी खातात.

▪️काही जनावरांच्या पायाला सूज येते तर काही लंगडतात सुद्धा.

वरील कुठल्याही प्रकारची लक्षणे आपल्या जनावरांना दिसून आली. तर तात्काळ आपल्या जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय विभागास माहिती द्यावी. महाराष्ट्र शासकीय पशुवैद्यकीय विभागातर्फे एक लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे.

 

लंम्पि- होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यावी

▪️लंम्पि हा आजर आपल्या जनावरांना होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी विशिष्ट काळजी घेतली पाहिजे. जर आपल्याकडील एखाद्या जनावराला अशा प्रकारचा आजार असेल तर त्याला इतर जनावरांपासून वेगळे ठेवले पाहिजे.

▪️विशिष्ट डास आणि गोचीड यांचा प्रतिबंध करणे.

▪️त्याचबरोबर जनावरांच्या गोठ्यात योग्य औषधाची फवारणी करून घेणे.

▪️ज्या गावातील जनावरांना अशा प्रकारचा आजार झाला आहे त्यांनी आपली जनावरे इतर गावात एकत्रित जनावरे चारण्यासाठी नेऊ नयेत.

लंपी या आजारासंबंधी काही शंका असतील. तर जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना किंवा अधिकारी यांना संपर्क करावा. तसेच टोल फ्री क्रमांक १८००२३३०१ किंवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशु सेवेचा टोल फ्री क्रमांक १९६२ यावर तात्काळ संपर्क साधावा.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close