-->
करमाळाकृषी विषयक

दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या पाणीप्रश्नावर उद्या घोटीत महत्त्वपूर्ण बैठक

माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार चर्चा; लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

 

प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)

दहिगाव उपसा सिंचन योजना ही करमाळा तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी योजना आहे. मात्र, योजनेच्या आवर्तनापासून लाभक्षेत्रातील अनेक गावे वंचित राहत असल्याने शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांत पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळत नसल्याने या प्रश्नावर सामूहिक तोडगा काढण्यासाठी उद्या, रविवार दि. ८ नोव्हेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.

माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली ही बैठक सायंकाळी ४ वाजता साडे-घोटी रोडलगत असलेल्या राऊत-पाटील फार्म हाऊस येथे होणार आहे.

 

दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनाचे नियोजन, लाभक्षेत्रातील वंचित गावांना पाणीपुरवठा, खरीप व रब्बी हंगामातील पाण्याचे योग्य नियोजन तसेच शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळविण्यासाठी संबंधित विभागाकडून आवश्यक कार्यवाही करून घेणे, या विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे. केवळ चर्चा न करता या समस्यांवर ठोस उपाययोजना निश्चित करून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सामूहिक पाठपुरावा करण्याचा उद्देश आहे.

 

कुंभेज, देवळाली, खडकेवाडी, गुळसडी, पाडळी, डोह, पांडे, शेलगाव (क), सौंदे, फिसरे, हिसरे, अर्जुननगर, वरकटणे, कोंढेज, निंभोरे, साडे, घोटी, सालसे, आळसुंदे, वरकुटे, मलवडी आदी गावांतील शेतकरी बांधवांनी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी एकजुटीने आवाज उठविण्याची गरज असून, शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक घोटीचे सरपंच विलास काका राऊत यांनी केले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close