
माय मराठी न्यूज


सर्वसामान्य नागरिकांना पिण्यासाठी आरोचे फिल्टर पाणी अल्प दरात मिळावे, या उद्देशाने करमाळा तालुक्यातील पोथरे ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या निलज, पोथरे येथील जिल्हा परिषद शाळा व संगोबा येथील आदिनाथ मंदिर परिसरात लाखो रुपये खर्च करून आरओ फिल्टर प्लॅन्ट बसवण्यात आले होते. परंतु, गेली सहा ते सात महिन्यांपासून हे आरओ फिल्टर ठेकेदारांच्या दुर्लक्षतेमुळे बंद होते.
ही बाब गटविकास अधिकारी मनोज राऊत व पोथरेचे सरपंच अंकुश शिंदे यांच्या निदर्शनास राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांनी निवेदनाद्वारे आणून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन गटविकास अधिकारी राऊत साहेब यांनी अवघ्या दोन दिवसात पोथरे, संगोबा येथील बंद असलेलें आरओ पाणी फिल्टर तात्काळ चालू करण्याचे आदेश देऊन ते चालू करून घेतले. यामुळे मा. राऊत साहेबांचे पोथरे, निलज, संगोबा येथील नागरिकांमधून कौतुक होत आहे.
यामध्ये पोथरेचे सरपंच अंकुश शिंदे, ग्रामसेवक हरीभाऊ दरवडे यांनीही संबंधित ठेकेदाराकडे सतत पाठपुरावा करून उर्वरित काम पूर्ण करून घेतले.




