
प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)


यवतमाळ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांतर्गत आयोजित राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत गुरुकुल पब्लिक स्कूल, करमाळा येथील ओम नरुटे या विद्यार्थ्याने उत्तुंग कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहे. ही स्पर्धा दि. २९ व ३० ऑक्टोबर २०२५ रोजी तालुका क्रीडा संकुल, डिग्रज (जिल्हा यवतमाळ) येथे पार पडली.
१४ वर्षाखालील मुलांच्या रिकव्हर राऊंड या प्रकारात ओम नरुटेने ६८५ गुण मिळवत पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करत वैयक्तिक गटात रौप्य पदक जिंकले. त्याचबरोबर ओमने वाराणसी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले वैयक्तिक स्थान निश्चित केले आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील स्पर्धकांमध्ये ओमने उत्कृष्ट कामगिरी करत करमाळा तालुक्याचा आणि गुरुकुल पब्लिक स्कूलचा लौकिक वाढविला आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून सातत्याने सराव करत असलेल्या ओमच्या यशामागे त्याचा मेहनतीचा आणि शिस्तबद्ध सरावाचा मोठा वाटा आहे. या विजयानंतर संस्थेचे अध्यक्ष भोगे सर, सचिव सौ. भोगे मॅडम, तसेच HOD शिंदे मॅडम आणि पवार मॅडम यांनी ओमचे अभिनंदन करत पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. ओमला क्रीडा शिक्षक सागर शिरस्कर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.




