-->
मनोरंजन

सहकार महर्षी जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन

 

प्रतिनिधी/अकलूज (माय मराठी न्यूज)

 

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगर, अकलूज (ता. माळशिरस) यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार महर्षि शंकरराव मोहिते- पाटील यांच्या १०७ व्या जयंती निमित्त दि. ०१ व ०२ फेब्रुवारी २०२५ रोजी भव्य राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धा शंकरराव मोहिते- पाटील स्मृतीभवन शंकरनगर अकलूज येथे दररोज दु. ०४ वाजल्यापासून होणार आहेत. जयंती समारंभ समितीचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. जयसिंह शंकरराव मोहिते- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते- पाटील, मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते- पाटील, युवा नेते सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते- पाटील यांच्या नेतृत्वात सालाबादप्रमाणे यंदाही ‘स्मृती भवन’ च्या भव्य बादशाही रंगमंचावर पारंपरिक व नवकवींच्या लावण्यांचा नजराणा राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून सादर होत आहे.

 

गेल्या अनेक दशकापासून महाराष्ट्राच्या पारंपारिक सांस्कृतिक कलेला लोकाश्रय मिळवून देणारे व लावणी कलावंतांचा योग्य सन्मान मिळवून देणारे हे व्यासपीठ गेल्या तीन दशकापासून कलारासिकांच्या हृदयात अधिराज्य करत आहे.

 

या स्पर्धेचे उदघाटन समारंभास सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री व लावणी नृत्यांगना सुरेखा कुडची उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेत एकूण दहा मानांकित लावणी पार्ट्या सहभागी होणार असून रसिकांसाठी पारंपरिक लोककलेची मेजवानीच ठरणार आहे. तरी या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी आजच आपली प्रवेशिका निश्चित करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close