
अकलूज/प्रतिनिधी


माढा व करमाळा तालुक्यातील जेऊर रेल्वे स्थानकावर सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळविण्यासाठी रेल्वेचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भाजप नेते धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी पत्र लिहून प्रवासी थांब्याची मागणी केली आहे.
सोलापुर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील लोकांना सोयीचे असलेल्या जेऊर व माढा तालुक्यातील माढा रेल्वे स्टेशनवर नेहमी प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. पुण्याला दररोज शाळा काॅलेजचे विद्यार्थी, नोकरदार वर्ग, हाॅस्पीटल्स करीता ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोईकरता हुतात्मा एक्सप्रेसचा थांबा आवश्यक आहे.
सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळाल्यास या शहरातील नागरिकांना मोठा फायदा होईल. तसेच शिक्षण, व्यवसायांच्या दृष्टीने या शहरांच्या विकासाला चालना मिळेल. दळण वळणाच्या दृष्टीने हुतात्मा एक्सप्रेसचा थांबा सोयीचा व गरजेचा असून रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा करणार असल्याचे धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी सांगितले.



