-->
क्राईम

खळबळजनक! गुप्तधनासाठी चिमुकलीचं अपहरण; अमावस्येला दिला जाणार होता नरबळी

 

माय मराठी न्यूज नेटवर्क

आज आपण आधुनिकतेच्या कितीही गप्पा मारत असलो तरीही समाजात अंधश्रद्धा अजूनही खोलपर्यंत रुजली असल्याचं अनेकदा समोर आले आहे. अशीच एक घटना पिंपरी चिंचवड आणि जुन्नर मध्ये घडली आहे. गुप्तधन हवे असेल तर लहान मुलीचा बळी द्यावा लागेल असे एका भोंदू बाबाने जुन्नर मध्ये राहणाऱ्या कुटुंबाला सांगितलं.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी शिताफीने तपास करीत नरबळीचा प्रकार उघडकीस आणला आहे. साडे तीन वर्षांच्या चिमुकलीची अवघ्या दहा तासातच अपहरणातून सुटका केली. चिखली पोलीस आणि गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्हीचा आधार घेतला आणि या संवेदनशील प्रकरणाचा उलगडा केला. याप्रकरणी चार आरोपींना अटक तर दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

जुन्नर येथील संतोष चौघुले आणि विमल चौघुले या दाम्पत्याला पैशाचा हव्यास सुटला होता. नरबळी केल्यास मालामाल होतात म्हणून गेल्या आठवड्यात चौघुले कुटुंबीयांनी नरबळीचा कट रचला. यासाठी एका बाळाची त्यांना गरज होती. विमल चौघुलेने याबाबत पिंपरी चिंचवडमध्ये वास्तव्यास असलेली तिची बहीण सुनीता नलावडेला याची कल्पना दिली. मग त्यांनी शेजारीच साडे तीन महिन्यापूर्वी आलेल्या कुटुंबाबाबत विमलला सांगितल. त्या कुटुंबात साडे तीन वर्षाची मुलगी होती. मग नरबळीसाठी तिचे अपहरण करायचं ठरलं.

 

असा केला अपहरणाचा प्लॅन

अपहरणासाठी विमलने तीच्या बारा वर्षांच्या मुलाला बहिणीच्या घरी पाठवलं. चार दिवसांपूर्वीच तो पिपरी चिंचवडमध्ये आला, त्याच्यावर त्या चिमुकलीला विश्वासात घेण्याची जबाबदारी सोपवली. त्यानुसार तो आल्यापासून त्या चिमुकलीला खाऊ द्यायचा, तिच्यासोबत खेळायचा, तिला स्वतःचा मोबाईल खेळायला द्यायचा. अशा पद्धतीने चिमुकलीशी ओळख निर्माण केली. मग शनिवारी (२३ जुलै) दुपारी खाऊ देतो असं सांगून, घरापासून दूर घेऊन गेला. तिथं त्या बारा वर्षीय मुलाची आई म्हणजेच विमल थांबली होती. तिथून ते काही अंतर पुढं गेले आणि विमलने चिमुकलीला उचून घेतलं. तोंडावर कापड टाकलं आणि तिथून थेट जुन्नरचं घर गाठलं. विमलने मुलाला मात्र पिंपरी चिंचवडच्या बहिणीकडेच ठेवलं. पोलिसांना चक्राऊन सोडण्यासाठी ही खेळी आखण्यात आली होती. दुसरीकडे बराच वेळ झाला तरी आपली मुलगी घरी येईना म्हणून चिमुकलीच्या आईने चिखली पोलिसांकडे अपहरणाची तक्रार केली. पोलीस आयुक्त अंकुश शिंदेंना प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आलं होतं. तपास एपीआय तौफिक सय्यद यांच्याकडे सोपविण्यात आला. सोबतीला गुन्हे शाखेचे पथक देण्यात आलं.

 

जवळपास दोनशे कर्मचाऱ्यांचा तपास

जवळपास दोनशे कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला सीसीटीव्ही तपासले त्यात बारा वर्षांच्या मुलासोबत ती आढळली म्हणून त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. पण मी त्या दुकानातून लगेच घरी आलो, असं उत्तर त्याने दिलं. तिथून पुढच्या दुकानात ही तोच बारा वर्षांचा मुलगा चिमुकलीसोबत दिसला. मग मात्र तो खोटे बोलत असल्याचं निष्पन्न झालं तरी तो मात्र कबुली देत नव्हता. मग त्याच्या कुटुंबियांच्या घरी जुन्नर पोलिसांना पाठविण्यात आलं. तिथं ती चिमुकली आढळून आली. अवघ्या दहा तासात चिमुकलीची सुखरूप सुटका करण्यात आली. याप्रकरणात सहभागी चौघुले आणि नलवडे कुटुंबियातील चौघांना अटक आणि दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतलं आहे. चौघुले कुटुंबियांना मार्गदर्शन करणारा कोण भोंदूबाबा आहे ? याचा तपास सुरू आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close