
प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)

अघोरी विद्या, जादूटोणा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली गोरगरीब जनतेला गंडा घालणारा भोंदूबाबा मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले याच्या कथित काळ्या कमाईची विल्हेवाट लावून ती पांढरी (व्हाईट) करण्याचा मोठा कारभार उघडकीस आला असल्याने याप्रकरणी अटकेत असलेली संशयित आरोपी दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव माया रामदास झोळ हिने दाखल केलेला जामीन अर्ज बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश सूरज व्ही. केन्द्रे यांनी फेटाळून लावला आहे.
कुर्डूवाडी (ता. माढा) पोलीस ठाण्यात दि. २१ एप्रिल २०२६ रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात मनोहर मामा भोसले आणि त्याच्या साथीदारांवर जादूटोणा विरोधी कायदा व संघटित गुन्हेगारी तसेच फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका व्यापाऱ्याला व्यवसायात यश मिळवून देण्याचे आमिष दाखवून, अघोरी पूजा करण्यासाठी ५० हजार रुपयांची आगाऊ रक्कम उकळण्यात आली होती. यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित व्यक्तीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणातील तपासादरम्यान अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून मनोहरमामा भोसले याने अंधश्रद्धेच्या जाळ्यातून आणि अघोरी पूजांच्या नावाखाली लोकांकडून उकळलेला प्रचंड काळा पैसा दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ आणि त्यांच्या पत्नी माया झोळ यांच्याकडे सुपूर्द केला जात होता. तो पैसा झोळ दाम्पत्याच्या शैक्षणिक संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर पगाराची पूर्ण रक्कम जमा केली जायची, परंतु त्यातील काही रक्कम कर्मचाऱ्यांकडून रोख स्वरूपात परत काढून घेतली जायची. पुढे मनोहरमामाचा रोख काळा पैसा संस्थेच्या हिशोबात आणि खात्यांमध्ये अॅडजस्ट करून तो कायदेशीर (व्हाईट) दाखवला जात होता आणि पुढे भोंदूबाबाच्या सांगण्यावरून इतर खात्यांवर वर्ग केला जात होता.
कोर्टात काय घडले?
सहआरोपी माया झोळ यांच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, “माझा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही, वैद्यकीय कारणास्तव व स्त्री असल्याने जामीन मिळावा, तसेच पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर आहे.” मात्र, सरकारी वकील आणि पोलीस तपासात समोर आलेल्या पुराव्यांनुसार न्यायालयाने स्पष्ट केले की, हे एक संघटित गुन्हेगारीचे रॅकेट आहे. आरोपींना जामीन दिल्यास त्या साक्षीदारांवर दबाव आणू शकतात, पुराव्यांशी छेडछाड करू शकतात किंवा फरार होऊ शकतात. तपासातील भक्कम पुरावे लक्षात घेता, बार्शी सत्र न्यायालयाने माया झोळचा नियमित जामीन अर्ज फेटाळण्याचा निर्णय दिला आहे.




