राज्यात ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाचा ईशारा; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी

माय मराठी न्यूज नेटवर्क


राज्याच्या बहुतांश भागांत मंगळवारी पावसाने उघडीप दिली होती. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत जोरदार सरी बरसल्या असल्या तरी पावसाचा जोर मात्र ओसरला. भारतीय हवामान विभागाने उद्या सकाळपर्यंत पुणे, पालघर, नाशिकसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
कोकणात पावसाचा जोर आता कमी झाला असला तरी घाटमाथा आणि इतर काही भागांत जोरदार पाऊस होत आहे. मंगळवारी कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. तर पुणे जिल्ह्यात मात्र पावसाने उघडीप दिल्याची स्थिती होती. सातारा जिल्ह्यातही पावसाने उघडीप दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांत राहून राहून जोरदार पाऊस पडत आहे. मात्र, जिल्ह्यात पावासाचा जोर कमी आहे. त्यामुळे नद्यांची पाणीपातळी कमी होतेय. तर सांगली जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून पावसाची रिमझिम पुन्हा सुरू झाली.
तर शिराळा तालुक्यातदेखील पुन्हा पाऊस सुरू झाला. मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी झाल्या. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांतील बहुतांश मंडळात पाऊस झाला. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील काही मंडळांत पावसाचा जोर अधिक होता. परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतही पाऊस हजेरी लावत आहे. नांदेड जिल्ह्यातील काही भागांत मंगळवारीही जोरदार सरी बरसल्या. तर परभणी जिल्ह्यातील काही मंडळांत मध्यम पाऊस झाला.
खानदेशातही राहून राहून पावसाच्या सरी कोसळत आहे. जळगाव, नंदुरभार जिल्ह्यांत पावसाचं प्रमाण तुलनेने जास्त आहे. धुळे जिल्ह्यातही चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीवर वाढ झालेली आहे. वाढणारे तण, मर रोगाची भीती यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
विदर्भात अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांतील काही भागांत जोरदार पाऊस होत आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही भागांतील पूरस्थिती अद्याप कायम आहे. अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर अधिक होता. बुलडाणा जिल्ह्यातील अनेक मंडळांत पावसाने हजेरी लावली. तर अकोला जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे नदी, नाल्यांतील पाण्याची पातळी वाढण्याचे प्रकार घडले आहेत. मूर्तिजापूर तालुक्यात दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.
काही ठिकाणी पुराचे पाणी शेतात घुसल्याने पीक व घरांचे मोठे नुकसान झाले. तर हवामान विभागाने उद्या सकाळपर्यंत पुणे, नाशिक आणि पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला. तर विदर्भातील बुलडाणा, वाशीम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.




