माय मराठी न्यूज नेटवर्क


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या अनेक आमदारांना त्यांच्या गटात आणले. आता १२ खासदारांना आपल्या गटात सामील केले आहे. या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मान्यता मिळावी यासाठी दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे. यासाठी एकनाथ शिंदे स्वत: दिल्लीला गेले आहेत. शिवसेनेत मोठी बंडखोरी झाल्याने पक्षाला उतरती कळा लागली आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. शिवसेनेकडून दिग्गजांची हकालपट्टी केली जात आहे. तर काही स्वतः राजीनामे देत आहेत.
शिवसेनेला बांधून ठेवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अनेक कार्यकर्ते, सामाजिक संघटनांसोबत बैठका घेत आहेत. शिवसेनेला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेत पडलेल्या फुटीला बंडखोर आमदार नाही, तर भाजप जबाबदार असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. “तुम्ही माझ्या पक्षातील कितीही बाण न्या; पण धनुष्य मात्र माझ्याकडेच आहे” असे उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यात मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यानंतर राज्यात ठाकरे आणि शिंदे यांच्यामध्ये संघर्ष दिसून येत आहे.
आज मंगळवार दि. १९ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांची उत्तर भारतीय एकता मंचसोबत बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, “तुम्ही माझ्या पक्षातील कितीही बाण न्या; पण धनुष्य मात्र माझ्याकडेच आहे हे लक्षात ठेवा. शिवसेनेमध्ये फूट बंडखोर आमदारांनी नाही, तर भाजपने पाडली. भाजप शिवसेना संपवत आहे. भाजप दोन कोंबड्यांमध्ये झुंज लावत आहे. यातील एक कोंबडा मेला की दुसऱ्या कोंबड्याला ते जेलमध्ये टाकतील” असे म्हणून ठाकरे यांनी भाजपवर निशाणा केला आहे.



