माय मराठी न्युज नेटवर्क


आयपीएल स्पर्धा काही तासांवर आलेली असतानाच सीएसके अर्थात चेन्नई सुपर किंग्जने मोठा निर्णय घेतला आहे. महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्ज संघाचं कर्णधार पद सोडलं असून, रविंद्र जडेजाकडे चेन्नईच्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आयपीएल च्या पंधराव्या हंगामासाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात चेन्नई सुपर किंग्जने रविंद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनीसह चार खेळाडूंना रिटेन केलं होतं. जडेजासाठी चेन्नईने १६ कोटी रुपये मोजले, तर महेंद्रसिंग धोनीला १२ कोटींमध्ये खरेदी केलं होतं. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज कर्णधार बदलू शकते अशी चर्चा आधीपासूनच सुरू होती. महेंद्रसिंग धोनीनंतर चेन्नई संघ व्यवस्थापन रविंद्र जडेजाकडे कर्णधार पदाची जबाबदारी सोपवेल असं सांगितलं जात होतं. अखेर आज चेन्नईने अधिकृतपणे याची घोषणा केली आहे.
रविंद्र जडेजा आधी दोघांनी केलं ‘सीएसके’ चं नेतृत्व
३३ वर्षीय रविंद्र जडेजाला यंदाच्या आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. जडेजा आधी दोन खेळाडूंनी चेन्नईचं नेतृत्व केलं आहे. महेंद्रसिंग धोनीकडे सुरुवातीपासून कर्णधार पदाची सुत्रं होती. मध्ये सुरेश रैनालाही नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. २००८ पासून महेंद्रसिंग धोनी कर्णधार आहे. धोनीने २१३ सामन्याचे नेतृत्व करताना १३० सामन्यात विजय मिळवून दिला. तर ६ सामन्यांमध्ये सुरेश रैनाकडे कर्णधारपद होते. यात ६ पैकी २ सामन्यात रैनाला विजय मिळवून देता आला.
धोनी आयपीएलमधूनही निवृत्ती घेणार का.?
धोनीचं वय सध्या ४० वर्ष आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतलेली आहे. मात्र, तो आयपीएलमध्ये खेळत होता. २००८ पासून कर्णधार असलेल्या धोनीचं हे शेवटचं आयपीएल असू शकतं, अशी चर्चा आता त्याने कर्णधार पद सोडल्यानंतर सुरू झाली आहे
२६ मार्चपासून आयपीएल स्पर्धा सुरू होत आहे. त्याच्या दोन दिवस आधीच चेन्नईने कर्णधार बदलण्याचा निर्णय जाहीर केला. सुरुवातीचा सामना चैन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे.cp mt




