इन्स्पायर अवार्ड स्पर्धेत कोमल शिंदे हिच्या प्रयोगाची राज्यस्तरावर निवड
प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


इन्स्पायर अवार्ड मानक एक्जीबिशन सन 2020 – 2021 जिल्हास्तरीय मूल्यमापनात श्री छत्रपती संभाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कोरेगाव भीमामधील विद्यार्थिनी कु. कोमल बापूसाहेब शिंदे या विद्यार्थिनीची जिल्हास्तरावरून राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य माणिक कुंभारकर व विज्ञान शिक्षक अनिल साकोरे यांनी दिली.
या आधी कोमल शिंदे हिच्या प्रयोगाची जिल्हा स्तरावर निवड करण्यात आली होती. त्यातून आता तिच्या प्रयोगाची राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली असल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. मागील वेळी देखील याच विद्यालयातील किशोर बापूसाहेब शिंदे व गणेश लक्ष्मण दहीवडे राज्यस्तरापर्यंत पोचले आहेत. यावर्षी कोमल बापूसाहेब शिंदे या विद्यार्थिनीच्या प्रयोगामुळे विद्यालयाला राज्यस्तरावर पोहोचण्याचा तिसऱ्यांदा मान मिळाला आहे. त्यामुळे कोरेगाव भीमा गावच्या, श्री छत्रपती संभाजी हायस्कूलच्या आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना राज्यस्तरावर पोचण्यासाठी आणि त्यांच्या प्रकल्पाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी विद्यालयातील विज्ञान शिक्षक अनिल साकोरे यांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामीण भागातील पालकांनी आपल्या पाल्यांना स्पर्धा परीक्षा, सामान्यज्ञान स्पर्धा तसेच वैज्ञानिक प्रयोगांमध्ये भाग घेण्यास प्रवृत्त केल्यास भावी काळात हेच विद्यार्थी उद्याचे वैज्ञानिक बनतील. असा विश्वास जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेचे माजी अध्यक्ष बापूसाहेब शिंदे यांनी व्यक्त केला.




