लम्पी’ रोखण्यासाठी बजरंग दलाची मदत घ्या; बजरंग दलाचे पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना निवेदन

मावळ/प्रतिनिधी


मावळ तालुक्यामध्ये लम्पी आजाराचा प्रभाव कमी दिसत असला तरी भविष्यात होणारा उद्रेक रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पाऊल उचलावी, अशी मागणी करून त्यासाठी सरकारी मनुष्यबळ कमी पडत असेल तर विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रशासनाच्या मदतीला घ्यावेत, अशी मागणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्यावतीने करण्यात आली आहे.
याबाबत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल मावळ प्रखंड गोरक्षा विभागाच्यावतीने बजरंग दलाचे विभाग संयोजक संदेश भेगडे, जिल्हा मंत्री महेंद्र असवले, अध्यक्ष गोपीचंद कचरे, अंकेश ढोरे, युवा व्याख्याते बाळासाहेब खांडभोर यांनी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी दीपक राक्षे यांना निवेदन दिले आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे, की देशभरात लम्पी आजाराने थैमान घातले असून, मोठ्या प्रमाणावर जनावरांमध्ये त्याची लागण झाली आहे. लाखो जनावरांचा बळी या आजाराने घेतला आहे. त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झालेला आहे.
दूध उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता
देशात अगोदरच दुगधजन्य जनावरांची संख्या झपाट्याने कमी झालेली आहे. त्यात अशा आजारांमुळे दुधाच्या उत्पादनात मोठी घट होउन त्याचा मानवी जीवनावर परिणाम होऊ शकतो. यासाठी या जनावरांना वाचवण्यासाठी तातडीने पावल उचलणे गरजेचे आहे. देशभरातील गोवंशाच्या रक्षणासाठी बजरंग दल सदैव तत्पर असते आणि अशा साथीच्या आजारांमध्ये गोवंशाचे रक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, ते कर्तव्य बजरंग दलाचे कार्यकर्ते पूर्ण करतील, असा विश्वास गोपीचंद कचरे यांनी व्यक्त केला आहे.




