माय मराठी न्यूज नेटवर्क


शिवसेनेच्या तब्ब्ल ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठी फूट निर्माण झाली आहे. त्यांनंतर आमदारांसोबतच आता पदाधिकारीही शिवसेनेतून शिंदे गटात सामील होताना दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पक्षातील पोकळी भरून काढण्यासाठी आणि पक्षाला नवी उभारी देण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. निष्ठा यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे लोकांची आणि शिवसैनिकांची भेट घेत आहेत. या निष्ठा यात्रेदरम्यान काल त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदारांनी गद्दारी का केली, असा सवाल त्यांना विचारला.
प्रसार माध्यमांच्या या प्रश्नांना उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार सुरळीत सुरू असताना काही जणांना महाराष्ट्राबाबत पोटदुखी होती. महाराष्ट्राचे नावलौकिक होत आहे. महाराष्ट्राची होत असलेली प्रगती काही लोकांना चांगली दिसली नाही, त्यामुळे त्यांनी गद्दारी केली.
निष्ठा यात्रेबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आजही शिवसेनेला लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद मिळत आहे. सगळीकडेच लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद शिवसेनेसोबतच आहे. सामान्य नागरिक असतील किंवा राजकीय लोक असतील, त्यांना माहीत आहे, शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंबप्रमुखाच्या पाठीत खंजीर खुपसला गेला होता. त्यामुळे सगळीकडेच शिवसैनिकांचं प्रेम आणि आशीर्वाद मिळत आहे. जे अराजकीय लोक आहेत ते देखील महाराष्ट्रातील घडामोडींवर लक्ष ठेवून होते. आम्ही महाराष्ट्रात फिरत आहोत. ही प्रेम यात्रा आहे, निष्ठा यात्रा आहे. आम्ही लोकांना भेटत आहोत, पण कोणावरही आरोप करत नाही, की टीका करत नाही.
राजकारण इतक्या खालच्या पातळीवर जाईल असे मला कधीही वाटले नव्हते. त्यांना सर्वकाही देऊनही ते उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून गेले, हे राजकारण तुम्हाला मान्य आहे का? मुळात देशात लोकशाही शिल्लक राहिली आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. तुमच्या भल्यासाठी, जिथे तुमचं चांगलं होत असेल तिथे नक्की जा, सुखी रहा तिथे. पण तुमच्या मनात आमच्याबद्दल जो राग आहे, तो आमच्या मनात तुमच्याबद्दल नाही. काही जण सात सात वर्ष सत्तेत राहिले त्यांचं त्यांना आता अपचन होत आहे, अशी टीका देखील आदित्य ठाकरे यांनी केली.



