-->
करमाळाक्राईम

माळढोक अभयारण्यात घोरपडीची शिकार करताना दोघे ताब्यात; वनविभागाची धडक कारवाई

जखमी घोरपड व तीन जाळी जप्त; दोन्ही आरोपींना दोन दिवसांची वन कोठडी

 

प्रतिनिधी | करमाळा (माय मराठी न्यूज)

 

माळढोक पक्षी अभयारण्यातील हूलगेवाडी (ता. करमाळा) परिसरात घोरपडीची शिकार करणाऱ्या दोघांवर वनविभागाने कारवाई केली आहे. वनविभागाच्या पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या जवळील जिवंत मात्र जखमी अवस्थेतील घोरपड तसेच तीन जाळी जप्त केली असून त्यांना न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची वन कोठडी सुनावली आहे.

वनविभागाच्या माहितीनुसार रविवार दि. ९ ऑगस्ट रोजी माळढोक पक्षी अभयारण्याच्या हूलगेवाडी येथील गट क्रमांक ३२ परिसरात वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. दुपारच्या सुमारास अभयारण्याच्या राखीव वनक्षेत्रात दोन व्यक्ती घोरपडीची शिकार करत असल्याचे वनकर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. वनपथकाने घटनास्थळी पाहणी केली असता अक्षय शिवदास गोरे (वय ३०) आणि सुरेश रामदास गायकवाड (वय ४०) दोघेही रा. वंजारवाडी (ता. करमाळा) हे शिकार करताना आढळून आले. त्यांच्या ताब्यात एक जिवंत परंतु जखमी अवस्थेतील घोरपड आढळून आली. तसेच शिकार करण्यासाठी वापरण्यात आलेली तीन जाळीही मिळून आली. वनविभागाने घोरपड व तीनही जाळी जप्त केली.

या प्रकरणी वनविभागाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार कारवाई केली. सोमवार दि. १० ऑगस्ट रोजी दोन्ही आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, करमाळा यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची वन कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास माळढोक पक्षी अभयारण्य करमाळ्याच्या वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एच. साळुंखे या करत आहेत.

सदर कारवाई वन्यजीव विभाग पुणेचे उपवनसंरक्षक केशव वाबळे आणि माळढोक पक्षी अभयारण्यचे सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी रोहिणी साळुंखे, वनपाल अनंता कारंडे, पद्मिनी कांबळे, वनरक्षक माधुरी जाधव, प्रदीप शिंदे, बबन दहातोंडे, नवनाथ दळवी तसेच सर्व वनमजूर व रेंज स्टाफने यांनी केली.

वन्यजीव हे पर्यावरणातील महत्त्वाचा घटक असून घोरपड यासारख्या वन्यप्राण्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. अभयारण्यातील वन्यजीवांची शिकार, तस्करी किंवा त्यांना इजा करण्याच्या प्रकारांविरुद्ध वनविभागाकडून यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.


माळढोक पक्षी अभयारण्यातील वन्यजीवांचे संरक्षण करणे ही वनविभागाची प्राथमिक जबाबदारी आहे. वनक्षेत्रात वन्यप्राण्यांची शिकार किंवा वन्यजीवांना इजा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर वनविभागाकडून कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनीही अभयारण्यातील वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाला सहकार्य करावे.

– आर. एच. साळुंखे, वनपरिक्षेत्र अधिकारी, करमाळा.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close