-->
करमाळाकृषी विषयकक्राईम

पारेवाडीत शेतीपंप वायर चोरट्यांचा धुमाकूळ; दहा शेतकऱ्यांचे शेतीपंप फोडून वायर लंपास

 

प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)

 

करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात शेतीपंपाच्या वायर चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून आता चोरट्यांनी पारेवाडी परिसरात धुमाकूळ घातला आहे. पारेवाडी (ता. करमाळा) येथील तब्बल दहा शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची तोडफोड करून त्यामधील वायर चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

गेल्या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे पारेवाडी लघुपाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. त्यामुळे परिसरातील अनेक शेतकरी या तलावावरील पाण्यावर शेती करत आहेत. मात्र यावर्षी पावसाने ओढ दिल्याने तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून शेतकरी पाईप व केबल वाढवून पाणी उपसा करत आहेत. अशा अडचणीच्या काळातच चोरट्यांनी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका दिला आहे.

 

या चोरीत राजेंद्र अंकुश जाधव, सुभाष खोटे, सतीश सुरेश खोटे, संभाजी निवृत्ती शिंदे, उद्धव सोपान देवकर, मारुती आदिनाथ जाधव, तानाजी विठ्ठल शिंदे, सुनील सोमनाथ नवले, सार्थक राजेंद्र जाधव आणि सुनील कुंडलीक घाडगे या शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची तोडफोड करून त्यामधील वायर चोरून नेण्यात आली असून या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

 

उजनी बॅकवॉटर परिसरात यापूर्वीही शेतीपंपाच्या वायर चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. सुमारे सात महिन्यांपूर्वी केत्तूर परिसरातील पाच ते सहा शेतीपंपांच्या वायर चोरीला गेल्या होत्या. त्या घटनेचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसतानाच आता पारेवाडी लघुपाटबंधारे तलाव परिसरात पुन्हा अशीच घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

 

सध्या एकीकडे पावसाअभावी पाण्याचे संकट, तर दुसरीकडे शेतीपंपाच्या वायर चोरीमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. या भागात सुरू असलेले चोरीचे सत्र तातडीने थांबवून आरोपींना अटक करावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.


 

तातडीने कारवाईची मागणी

“पोलीस प्रशासनाने शेतीपंपाच्या वायर चोरीच्या घटनांची गंभीर दखल घ्यावी. या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींना तात्काळ अटक करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.”

— रवींद्र रामहरी नवले, शेतकरी, पारेवाडी.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close