जाणुन घ्या- छत्रपती शिवाजी महाराजांची गारद (घोषणा) व त्याचा अर्थ
छत्रपती शिवाजी महाराजांची गारद व त्याचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू
महाराज राजदरबारात प्रवेश करत असताना जी ललकारी दिली जायची तिला मराठीत “गारद” म्हणतात. उर्दूमध्ये या ललकारी ला “अल्काब” तर संस्कृत मध्ये “बिरूद” किंवा “बिरुदावली” असे म्हणले जाते.


🚩#दुर्गपती- गडकोटांचे अधिपती ज्यांचे गडकोटांवर आधिपत्य (राज्य) आहे असे राजे.
🚩#गज-अश्वपती- असे महाराज ज्यांच्याकडे त्यांच्या मालकीचे हत्ती व घोड्यांचे दल आहे. त्यावेळी हत्ती हे वैभवाचे प्रतीक समजले जायचे. तर याला आपण वैभवसंपन्न असेही म्हणू शकतो.
🚩#भूपती-प्रजापती- वास्तविक राज्याभिषेक म्हणजे राज्यकर्त्यांचा भूमीशी झालेला विवाह आहे. म्हणजेच त्या राज्यकर्त्याने त्या भूमीचे व प्रजेचे वर (पती) हे पद स्वीकारले आहे व तो त्यांचे सर्वथा रक्षण करणार हे त्याचे प्रथम कर्तव्य आहे.
🚩#सुवर्णरत्नंश्रीपती- नानाविध, हिरे, माणिक, मोती व सुवर्ण (सोने) यांच्यावर ज्याचे आधिपत्य (मालकी) आहे असे राजे. शिवरायांच्या बाबतीत ३२ मनी सिंहासनाचे व एक करोड होणांचे अधिपती.
🚩#अष्टावधानजागृत- आठ प्रहर (वेळेचे भाग) आठही दिशांवर जागृत लक्ष असणारे भूपाल (राजा).
🚩#अष्टप्रधानवेष्टीत- ज्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्यकारभारात त्यांचा सल्ला ही घेणारे राजे.
🚩#न्यायालंकारमंडित- कर्तव्यकठोर, न्यायकठोर, सत्याच्या व न्यायाच्या बाजूने निकाल देणारे महाराज.
🚩#शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत- प्रत्येक शस्त्रविद्या व शास्त्रात पारंगत (निपुण) असलेले राजे.
🚩#राजनीतीधुरंधर- राजकारणात (राजनीतीमध्ये) तरबेज आहेत असे राजे.
🚩#प्रौढप्रतापपुरंधर- पराक्रम करून ज्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे असे परमप्रतापी राजे.
🚩#क्षत्रियकुलावतंस- क्षत्रिय कुळात जन्म घेतलेले व त्या कुळात सर्वात उंच प्रतीचा (अवतंस) पराक्रम गाजवलेले असे राजे.
🚩#सिंहासनाधीश्वर- जसा देव्हाऱ्यात देव शोभून दिसतो तसेच सिंहासनावर शोभून दिसणारे सिंहासनाचे अधिपती.
🚩#महाराजाधिराज- सर्व भूपाला (राजा) मध्ये ऊठून दिसतो व सार्या राजांनी ज्याचे मांडलिकत्व स्वीकारले आहे असे राजे.
🚩#राजाशिवछत्रपती- ज्याच्यावर सुवर्णाची छत्रचामरे ढळत आहेत अथवा ज्याच्यावर प्रजेने छत्र धरून आपला अधिपती म्हणून स्वीकारले आहे किंवा ज्याच्या नभाने छत्र धरले आहे असे छत्रपती शिवराय.




