संतापजनक:१६ वर्षीय आईने नवजात बालिकेला दुसऱ्या मजल्यावरून फेकले; बॉयफ्रेंड सह मुलीला अटक
माय मराठी न्युज नेटवर्क


पालघर जिल्ह्यातील विरार येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन म्हणजे १६ वर्षीय आईनेच जन्म दिलेल्या नवजात बालिकेला राहत्या सात इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील बाथरूमच्या खिडकीतून फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विरार पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ३ ऑगस्ट रोजी रात्री ११:०० वाजता मुलीने बालिकेला जन्म दिला होता. माहितीनुसार, ती मुलगी आपल्या आई- वडीलांसोबत त्या इमारतीत राहत असून तिने प्रेग्नेंट असल्याचे आपल्या आई – वडीलांपासून लपवले होते. त्यासाठी ती लूज कपडे वापरत असे.
बाथरुमच्या खिडकीतून नवजात बालिकेला फेकल्यानंतर सुमारे २० मिनिटांनी इमारतीच्या डक्टजवळ एक बाळ असल्याचे स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्या बालिकेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, ती वाचू शकली नाही. या प्रकरणाची खबर तेथील रहिवाशांनी विरार पोलिसांना दिली. अगोदर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले परंतु त्यांना काहीही संशयास्पद आढळले नाही. त्यानंतर त्यांनी इमारतीतील प्रत्येक घर तपासण्यास सुरुवात केली असता इमारतीत तीन महिला प्रेग्नेंट असल्याची माहिती त्यांना मिळाली.
दुसऱ्या मजल्यावरील बाथरूमच्या खिडकीला असलेल्या ग्रिलबाहेर तसेच बाथरूम मध्ये ही पोलीसांना रक्ताचे डाग दिसून आले. त्यानंतर पोलिस त्या १६ वर्षीय मुलीला तपासणी साठी डॉक्टरांकडे घेऊन गेले. सुरुवातील आरोप नाकारणाऱ्या मुलीने तपासानंतर केलेल्या गुन्हाची कबुली दिली.
अधिक चौकशी दरम्यान सदर १६ वर्षीय मुलीला २५ वर्षीय बॉयफ्रेंड असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर त्या बॉयफ्रेंडची देखील चौकशी करून पोलिसांनी बॉयफ्रेंड विरुद्ध पोक्सो ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती विरार पोलिसांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली. दरम्यान, मुलीविरुद्ध आयपीसी कलम ३१५ आणि ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




