करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


सोलापूर जिल्ह्याला शिवसेनेचा संपर्क प्रमुख नसल्यामुळे पक्षसंघटनेत विस्कळीतपणा आला असून तात्काळ जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून शिवसेना नेते विश्वनाथ नेरूरकर यांची निवड करावी अशी मागणी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संजय शीलवंत यांनी पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे.
सदर पत्रामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना ठराविक घराण्यांच्या ताब्यात कित्येक वर्षे राहिल्यामुळे शिवसेनेचा विस्तार होऊ शकला नाही. पक्षाचा वापर स्वार्थासाठी झाल्यामुळे शिवसेनेला निवडणूकीत भरीव यश मिळाले नाही. विश्वनाथ नेरूरकर संपर्कप्रमुख असताना सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचे चार आमदार निवडून आले होते. तर धाराशिव चा खासदार सातत्याने शिवसेनेचा निवडून येत होता. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका यात शिवसेनेला घवघवीत यश मिळत होते. सध्या मात्र संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेची वाताहात झाली असून गटबाजी व स्वतःचा स्वार्थ, शिवसेनेत सहभागी होणारे नवीन कार्यकर्ते, नेते यांना आडकाठी करणे, या प्रवृत्तीमुळे शिवसेना खुंटत आहे. आज पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कारभारावर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता खुश आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटावा असे काम उद्धव ठाकरे करत आहेत. यामुळे आगामी काळात शिवसेनेच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणावर सोलापूर जिल्ह्यातील मतदार उभा राहणार असल्याचे चित्र आहे. पण संकुचित नेतृत्वामुळे शिवसेनेला अपयश येत आहे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची कार्यकारणी बरखास्त करून नवीन कार्यकर्त्यांना संधी देणे गरजेचे झाले आहे. सोलापूर जिल्ह्याची खडानखडा माहिती असलेले विश्वनाथ नेरूरकर साहेब पुन्हा चांगले दिवस आणू शकतात. सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आदी निवडणुका आहेत. तरी या सर्व पार्श्वभूमीचा विचार करून तात्काळ सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून विश्वनाथ नेरूरकर यांची नेमणूक करावी. अशी मागणी शीलवंत यांनी पत्राद्वारे केली आहे. या निवेदनाच्या प्रती शिवसेना सचिव, अनिल देसाई, विनायक राऊत, सुरज चव्हाण, यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.
याबाबत पत्रकारांशी बोलताना शीलवंत म्हणाले की, लवकरच सोलापूर जिल्ह्यातील निष्ठावान शिवसैनिकांचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांची भेट घेणार असून वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडणार आहे.




