मांगी तलावासाठी वरदायिनी ठरणाऱ्या रिटेवाडी उपसा सिंचन योजनेबाबत तात्काळ बैठक लावू; मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही

करमाळा/प्रतिनिधी


राज्याच्या विकासात सहकार क्षेत्राचे महत्वपूर्ण योगदान असून, राज्यात १४ लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीखाली आहे. सोलापूर जिल्हा हा साखर पट्टा असून या भागाचा विकास महत्वाचा आहे. त्या पार्श्वभूमीवर रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजनेबाबत तात्काळ बैठक घेऊन ही योजना मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. ते आज आदिनाथ सहकारी साखर कारखाना शेलगावं-भाळवणी (ता. करमाळा) या साखर कारखान्याच्या २७ व्या मोळीपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
यावेळी अधिक बोलताना ते म्हणाले की, प्रत्येक मंत्रीमंडळ बैठकीत रखडलेल्या सिंचन योजनांना सुधारित मान्यता देऊन गती देण्याचा या सरकारने प्रयत्न केला असून त्यातून जवळपास अडीच लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजने बाबतही जलसंधारण विभागाची तात्काळ बैठक घेऊन ही योजना मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. तसेच करमाळा तालुक्यातील सर्व विकासाचे प्रकल्प पूर्ण केले जातील. सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकार काम करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत, आमदार श्री राजेंद्र राऊत, रणजितसिंह मोहिते पाटील, प्रा. राम शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, हर्षवर्धन पाटील, आदिनाथ कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे व सर्व संचालक, मकाई कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल, संचालिका रश्मी बागल आदि मान्यवर तसेच बाळासाहेबांची शिवसेनेचे व भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.




