वडगाव (द) येथे अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्त उत्साहात रामोत्सव साजरा

करमाळा/प्रतिनिधी


अयोध्या येथील श्रीराम मंदिरात आज सोमवार दि. २२ जानेवारी रोजी ५०० वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली असून त्या निमित्त संपूर्ण देशामध्ये रामोत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्त वडगांव दक्षिण (ता. करमाळा) येथे भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहाने रामोत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सायंकाळी सहा वाजता प्रभु श्रीरामचंद्राच्या प्रतिमेची पालखीमधून टाळ- मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. पालखी आपल्या दारात आल्यानंतर महिलांनी प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेची पूजा केली. त्यानंतर हभप हनुमंत काळे महाराज यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराविषयी थोडक्यात माहिती सांगितली व आरती करून महादेव मंदिरात मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
ग्रामस्थांचा वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री ९ वाजता हभप काळदाते महाराज यांचे प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जीवन चरित्राविषयी कीर्तन झाले. त्यानंतर रात्री अकरा वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.




