
प्रतिनिधी | करमाळा (माय मराठी न्यूज)


ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सक्षम ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आशा वर्कर भगिनी सध्या विविध समस्यांना सामोरे जात आहेत. अत्यल्प मानधन, वाढता कामाचा ताण, वेळेवर मोबदला न मिळणे आणि आवश्यक शासकीय सुविधा न मिळाल्यामुळे त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष गणेश कांबळे यांनी व्यक्त केले.
कोरोना काळापासून आजपर्यंत आशा वर्कर यांनी जीव धोक्यात घालून गावोगावी जाऊन आरोग्य सेवा दिली आहे. जनजागृती, लसीकरण, माता-बाल संगोपन तसेच विविध आरोग्य मोहिमांमध्ये त्यांनी मोठे योगदान दिले आहे. मात्र त्यांच्या कामाच्या तुलनेत मिळणारे मानधन खूपच कमी असून तेही अनेक वेळा वेळेवर मिळत नाही, ही गंभीर बाब असल्याचे कांबळे यांनी सांगितले.
शासनाने आशा वर्कर यांना कायमस्वरूपी कर्मचारी दर्जा द्यावा, त्यांचे मानधन वाढवावे तसेच विमा संरक्षण, निवृत्ती वेतन व इतर शासकीय सुविधा तात्काळ लागू कराव्यात, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. तसेच आशा वर्कर यांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाने सकारात्मक दृष्टीकोनातून पाहून लवकर निर्णय घ्यावा. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची भेट घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.



