
प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)


करमाळा शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व तळागाळातील नागरिकांना तात्काळ आणि मोफत आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने कानाड गल्ली येथे नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या केंद्राचे उद्घाटन ज्येष्ठ माजी नगरसेवक रामचंद्र घोलप यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा मोहिनीताई सावंत उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक नगरसेवक सचिन घोलप यांनी सांगितले की, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत करमाळा शहरातील हा तिसरा दवाखाना सुरू झाला आहे. या केंद्रामुळे गोरगरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोफत औषधे, शुगर, बीपी, रक्त, लघवी व साखर तपासणीसह विविध आरोग्य सुविधा मिळणार आहेत. या केंद्रात एमबीबीएस किंवा बीएचएमएस पात्रतेचे डॉक्टर तसेच आवश्यक कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ४ ते ६ या वेळेत सेवा उपलब्ध राहणार आहे. रविवारी व राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी केंद्र बंद राहील.
नगरसेवक सचिन घोलप यांनी या केंद्रासाठी महिला भाजपा प्रदेश उपाध्यक्षा रश्मीदीदी बागल व युवा नेते दिग्विजय भैया बागल यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे सांगितले. नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी उपनगराध्यक्ष अतुल फंड, विरोधी पक्षनेते प्रशांत ढाळे, मुख्याधिकारी सचिन तपसे, तालुका आरोग्य अधिकारी महेश्वर काटकर, नगरसेवक संजय सावंत, विक्रमसिंह परदेशी, पूजाताई इंदलकर, लताताई घोलप, निर्मला गायकवाड, स्वातीताई फंड, चैत्राली सावंत, दीपक चव्हाण, सुनीताताई ढाणे, ज्योत्स्नाताई लुनिया, संदीप कांबळे, जबीन मुलानी, रवी जाधव, सुवर्णा आलाट, युवराज चिवटे, अश्विनी अब्दुले, साजदा कुरेशी तसेच सामाजिक कार्यकर्ते विजयराव लावंड, सोमा माने, बाबासाहेब माने, भाऊ राखुंडे, डॉ. पद्माळे व त्यांचा स्टाफही उपस्थित होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सूत्रसंचालन आरोग्य विभागाचे शिवाजी खंडागळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन लताताई घोलप यांनी मानले.



