
करमाळा/प्रतिनिधी


सोलापूर जिल्ह्यातील मध्य रेल्वेच्या माढा, जेऊर व केम या रेल्वेस्थानकावर आणखी तीन एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना थांबा मिळाला आहे. यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून हे थांबे मिळाले असल्याची माहिती भाजपचे करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी पत्रकारांना दिली आहे.
करमाळा तालुक्यातील केम व जेऊर येथे एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा. अशी करमाळा तालुक्यातील प्रवाशांची अनेक दिवसांपासून मागणी होती. यासाठी प्रवाशांची आंदोलनेही झाली होती. या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन खासदार निंबाळकर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्याने या एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळाला आहे. याशिवाय माढा रेल्वे स्थानकावर ही एका एक्सप्रेस गाडीला थांबा मिळाला आहे.
जेऊर रेल्वे स्थानकावर कोणार्क एक्सप्रेस या गाडीला तर केम रेल्वे स्थानकावर कन्याकुमारी एक्सप्रेस या रेल्वे गाडीला थांबा मिळाला आहे. माढा या रेल्वे स्थानकावर दादर सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस या गाडीला थांबा मिळाला आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष चिवटे यांनी दिली आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील नागरिकांची दिल्ली येथे काही कामे असतील तर नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहनही चिवटे यांनी केले आहे.
लवकरच पारेवाडी रेल्वे स्टेशनला ही एक्सप्रेस थांबणार ..?
केम व जेऊर येथील रेल्वे प्रवाशांच्या मागणीचा विचार करून रेल्वे मंत्रालयाकडुन कोनार्क आणि कन्याकुमारी या एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळाला आहे. याचप्रमाणे पारेवाडी रेल्वे स्थानकावर झालेल्या एल्गार मोर्चाची व रेल्वे प्रवाशी संघटनेच्या मागणीची दखल खासदार व रेल्वे प्रशासन यांनी घेतली असुन लवकरच पारेवाडी रेल्वे स्टेशन येथेही एक्सप्रेस गाडीला थांबा मिळेल अशी माहीती भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सदस्य गणेश चिवटे यांनी दिली आहे.
ॲॅड. अजित विघ्ने निमंत्रक, रेल्वे प्रवाशी संघटना




